Military Canteen: लष्कर कँटिनमधील दारू विकल्याचा आरोपातून मारहाण; २ कर्नलसह ७ जणांवर गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: February 24, 2022 06:39 PM2022-02-24T18:39:29+5:302022-02-24T18:40:29+5:30
रेंजहिल्स गोल मार्केट येथील लष्कराच्या कॅटिंनमधील स्वस्तातील दारु बाहेरच्या लोकांना विकत असल्याचा आरोप करुन कँटिनमधील जवानाला बेदम मारहाण
पुणे : रेंजहिल्स गोल मार्केट येथील लष्कराच्या कॅटिंनमधील स्वस्तातील दारु बाहेरच्या लोकांना विकत असल्याचा आरोप करुन कँटिनमधील जवानाला बेदम मारहाण करुन त्याला २० दिवस कन्फाईनमेंट डिटेन्शन सेलमध्ये ठेवून जीवे मारण्याची धमकी देण्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी खडकी पोलिसांनी २ कर्नलसह ७ जणांवर गुन्हा दाखल केला आहे. कर्नल जितेंद्र सिंग, कर्नल सिद्धु, नायब सुभेदार सचिन, हवालदार श्रीनिवास, शिपाई कलमजित, नाईक राधेश्याम (रा. खडकी) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.
याप्रकरणी मानव अजित घोष (वय ३४, रा. मिलटरी हॉस्पिटल, रेंजहिल्स, खडकी) यांनी खडकी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ही घटना रेंजहिल्स गोल मार्केट येथे ६ जुलै २०२१ रोजी रात्री साडे आठ वाजता घडली होती. लष्करातील अधिकारी, जवान यांना सर्व जीवनाश्यक साहित्य कमी किंमतीत लष्कराच्या कॅंटिंगमधून दिले जाते. त्यात लिकर/दारु ही बाजारभावापेक्षा कमी किंमतीत मिलटरी कॅटिंगमध्ये मिळत असते. मानव घोष हे रेंजहिल्स गोल मार्केट येथील मिलटरी कँटिनमध्ये कामाला आहेत. ते कँटिनमध्ये असताना आरोपींनी त्यांना तेथून घेऊन गेले. सीएसडी लिकर कँटींगमधून बेकायदेशीररित्या बाहेरील व्यक्तीला विकत असल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला. कर्नल जितेंद्र सिंग यांनी फिर्यादीला मारहाण केली. लोखंडी रॉडने फिर्यादीचे डाव्या पायाचा गुडघा व डाव्या हाताचे खांद्याला मारहाण करुन दुखापत केली. फिर्यादीचे नातेवाईकांना कोणतीही कल्पना न देता फिर्यादीस २० दिवस चौकशी करीता कन्फाईनमेंट डिटेन्शन सेल येथे ठेवले होते. फिर्यादीला मानसिक व शारीरीक त्रास देऊन वेगवेगळ्या मोबाईलवरुन जीवे मारण्याची वेळोवेळी धमकी देण्यात आली. असे फिर्यादीत म्हटले आहे. याप्रकरणी घोष यांनी नोव्हेंबरमध्ये पोलिसांकडे तक्रार अर्ज केला होता.
याप्रकरणाची लष्कराच्या वतीने कोर्ट ऑफ इन्कॉयरी झाली. त्यात त्यांच्यावर चार्ज ठेवण्यात आला आहे. मात्र, घोष याला मारहाण झाल्याबाबत कोणतेही स्पष्टीकरण मिळाले नाही. त्यानंतर आता मानव घोष यांच्या तक्रारीवरुन फिर्याद नोंदवून खडकी पोलिसांनी दोघा कर्नलसह ७ जणांवर गुन्हा दाखल केला.