पेट्रोल चोरी संशयावरून बेदम मारहाण; उपचारादरम्यान तरुणाचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: December 3, 2024 11:02 AM2024-12-03T11:02:34+5:302024-12-03T11:03:41+5:30
नऱ्हे येथील घटना; सिंहगड रस्ता पोलिसांकडून प्रकरण दाबण्याचा प्रयत्न
पुणे :पेट्रोलचोरी केल्याच्या संशयावरून एका तरुणाला बेदम मारहाण केल्याने उपचारादरम्यान त्या तरुणाचा मृत्यू झाला. ही घटना नऱ्हे येथे घडली. समर्थ नेताजी भगत (वय २०, रा. व्यंकटेश्वरा सोसायटी, अभिनव कॉलेज रोड, नऱ्हे, पुणे) असे मयत तरुणाचे नाव आहे. याबाबत नेताजी सोपान भगत यांनी सिंहगड रस्ता पोलिस ठाण्यात फिर्याद दिली असून याप्रकरणी चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सुशांत सुरेश कुटे, गौरव संजय कुटे (वय २४ वर्षे) अजिंक्य चंद्रकांत गांडले (वय २० वर्षे) राहुल सोमनाथ लोहार, (वय २३ वर्षे, सर्व राहणार मानाजीनगर, नऱ्हे) यातील सुशांत कुटे हा बेपत्ता झाला असून गौरव कुटे, अजिंक्य गांडले, राहुल लोहार यांना पोलिसांनी अटक केली आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, सिंहगड रस्ता परिसरातील नऱ्हे येथील मानाजीनगर भागात २५ नोव्हेंबर रोजी पहाटे सहा वाजण्याच्या सुमारास माजी उपसरपंच सुशांत कुटे यांच्या ऑफीससमोर फिर्यादी यांचा मुलगा समर्थ हा गाडीतील पेट्रोल संपल्याने ते दुसऱ्या गाडीतील पेट्रोल काढत असताना आरोपी गौरव संजय कुटे व त्याच्या इतर दोन ते तीन साथीदारांनी समर्थला चोर समजून लाथा बुक्क्यांनी, काठीने तसेच सायकलच्या चैनने त्याला मारहाण केली त्यामध्ये तो गंभीर जखमी झाला. त्यानंतर त्याला उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल केले, मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.
माहराणीचा व्हिडीओ पोलिसांना सापडला
समर्थ भगत या तरुणाला झालेल्या जबर मारहाणीनंतर सिंहगड रस्ता पोलिस ठाण्यात सुरुवातीला मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर खुनाचा प्रयत्न म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर शेवटी खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आला. याप्रकरणी आरोपी गौरव कुटे, अजिंक्य गांडले, राहुल लोहार या तीनही आरोपींना पोलिसांनी अटक केली असून माजी उपसरपंच सुशांत सुरेश कुटे हे सध्या बेपत्ता झाले आहेत. आरोपींनी मारहाण करताना केलेले तयार केलेले व्हिडिओ पोलिसांना मिळाले असून पोलिसांनी आरोपींचे मोबाइल जप्त केले आहेत.
पोलिसांनी मागितली 'मोठी रक्कम’ ; बड्या नेत्याच्या मध्यस्थीचा प्रयत्न अपयशी...
मुळात पेट्रोल चोरीवरून मारहाण झाली नसल्याची चर्चा परिसरात आहे. कारण वेगळेच असल्याची शंका स्थानिकांनी व्यक्त केली असली तरी पोलिसांनी मात्र पेट्रोल चोरीच्या संशयावरून मारहाण झाल्याचा गुन्हा सुरुवातीला दाखल केला. आरोपींनी पोलिसांना 'मॅनेज’ करायचा प्रयत्न केला. मात्र तेथील एका अधिकाऱ्याने ‘मोठी रक्कम’ मागितल्याने आरोपींनी शहरातील बड्या नेत्याकडे धाव घेतली. त्या बड्या नेत्याने बड्या अधिकाऱ्याला याबाबत सांगितले. तेव्हा त्या अधिकाऱ्याने आरोपींच्या विरोधात थेट गुन्हाच दाखल करायला लावल्याची माहिती सूत्रांनी दिली. मात्र गुन्हा घडल्यापासून ते कलमवाढ होईपर्यंत सिंहगड रस्ता पोलिसांनी याबाबत कमालीची गुप्तता राखली होती.