दिव्यांग व्यक्तीला खोलीत कोंडून मारहाण; पुण्यातील संतापजनक प्रकार
By राजू इनामदार | Published: April 19, 2023 03:55 PM2023-04-19T15:55:31+5:302023-04-19T16:15:45+5:30
दिव्यांग व्यक्ती घरामध्येच खासगी क्लास चालवून उदरनिर्वाह करतात
पुणे: दिव्यांग व्यक्तीला मारहाण केला, त्याचा अपमान केला यावरून चतु:श्रुंगी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. दोन शेजाऱ्यांमधील भांडणातून गुरूवारी हा प्रकार घडला. प्रहार या दिव्यांगासाठी काम करणाऱ्या संस्थेने याची दखल घेत दिव्यांग पतीपत्नींना दिलासा दिला व पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला. या प्रकरणाचा तपास करून दोषींवर कडक कारवाई करावी अशी मागणी संघटनेने केली.
प्रहार संघटनेचे पदाधिकारी रफिक खान यांनी सांगितले की पाषाणजवळ एकनाथ नगरमध्ये तायडे दांपत्य राहते. यातील पती दिव्यांग आहे. घरामध्येच खासगी क्लास चालवून ते उदरनिर्वाह करतात. मागील गुरूवारी यातील पत्नीसमवेत शेजाऱ्यांचा वाद झाला. त्यांनी दिव्यांग व्यक्तीच्या पत्नीला एका खोलीत कोंडून जबर मारहाण केली. संबधित महिलेचे दिव्यांग पती आल्यानंतर त्यांनी शेजाऱ्यांना याबाबत विचारणा केली. त्यावेळी त्यांनी त्यांच्या दिव्यांगपणावरून शिवीगाळ करण्यात आली. त्यांनाही धक्काबुक्की झाली. धमक्या देण्यात आल्या.
त्यामुळे दिव्यांग पती व त्याची पत्नी घाबरून गेले. त्यांनी संघटनेला याची माहिती दिली व मदत करण्याची विनंती केली. त्यावरून रफिक खान, अमोल शेरेकर,गुलाम मोमीन,राजेंद्र जोगदंड,शिवराज खोरे,अनिता जाधव व अन्य पदाधिकारी घटनास्थळी गेले. दिव्यांग पती व पत्नीला घेऊन ते चतु:श्रुंगी पोलिस ठाण्यात गेले. तिथे त्यांनी पोलिस निरीक्षक बालाजी पांढरे यांची भेट घेतली व त्यांच्याकडे फिर्याद दाखल केली. पांढरे यांनी त्यांना त्वरीत चौकशी करून गुन्हा दाखल करण्याचे आश्वासन दिले.