मोबाइल चोरीवरून मारहाण; बुधवार पेठेतील महिलेचा जागीच मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: February 13, 2024 12:54 PM2024-02-13T12:54:07+5:302024-02-13T12:54:28+5:30
महिला बुधवार पेठेत फिरून उदरनिर्वाह करत असून तिच्यावर काही गुन्हेही दाखल
पुणे : मोबाइलचोरीचा संशय घेत एका महिलेस तिच्या साथीदारासह बांबूने बेदम मारहाण करण्यात आली. यात महिलेचा जागेवरच मृत्यू झाला. याप्रकरणी दोघांना अटक केली असून, ही घटना बुधवार पेठेत श्रीनाथ थिएटरजवळ सोमवारी (दि. १२) सकाळी साडेआठच्या सुमारास घडली.
वर्षा शिवाजी थोरात (२५, रा. दांडेकर पूल, पर्वती) असे मृत महिलेचे नाव आहे. याप्रकरणी तिचा साथीदार आनंद बाळू सोनवणे (३०, रा. बुधवार पेठ) याने फरासखाना पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार अब्दुल सय्यद (रा. बुधवार पेठ) आणि गौरव चौगुले (रा. कसाब पेठ) यांना फरासखाना पोलिसांनीअटक केली आहे.
अधिक माहितीनुसार, मृत महिला वर्षा थोरात ही फिरस्ती आहे. ती बुधवार पेठेत फिरून उदरनिर्वाह करायची. तिच्यावर काही गुन्हेही दाखल आहेत. तिचा साथीदारही फिरस्ता आहे. बुधवार पेठ परिसरात आरोपींची अंडा भुर्जीची गाडी आहे. त्यांचा मोबाइल चोरीला गेल्यावर त्यांनी वर्षावर संशय व्यक्त केला. सोमवारी सकाळी साडेआठच्या सुमारास वर्षा आणि तिचा सहकारी बुधवार पेठेतील श्रीनाथ थिएटरजवळ चहा पिण्यासाठी आले असता आरोपी अब्दुल सय्यद आणि गौरव चौगुले तिथे येत बांबूने जबर मारहाण केली. या मारहाणीत वर्षा बेशुद्ध पडली असता तिला ससून नागरिकांनी रुग्णालयात दाखल केले. उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. अधिक तपास सहायक पोलिस निरीक्षक वैभव गायकवाड करत आहेत.