महावितरणच्या अभियंत्यांना मारहाण; ६ जणांवर गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2021 04:08 AM2021-06-25T04:08:33+5:302021-06-25T04:08:33+5:30
शिक्रापूर पोलिसांनी संजीवनी हॉस्पिटलचे संचालक डॉ. ज्ञानेश्वर टेमक, संजय गव्हाणे, गीतांजली संजय गव्हाणे, विनायक माणिक साबळे यांसह एका अनोळखी ...
शिक्रापूर पोलिसांनी संजीवनी हॉस्पिटलचे संचालक डॉ. ज्ञानेश्वर टेमक, संजय गव्हाणे, गीतांजली संजय गव्हाणे, विनायक माणिक साबळे यांसह एका अनोळखी व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शिक्रापूर येथील विद्युत वितरण कार्यालयाच्या कर्मचाऱ्यांना थकीत वीजबिल वसुलीचे काम सुरू असताना शिक्रापूर विद्युत वितरण विभागाचे सहायक अभियंता गणेश वगरे, धनंजय गढवे, रुपाली ढोबळे, संगीता कदम, संगीता तरोने हे सर्वजण गावातील थकीत बिले वसुली करत असताना सर्वजण पाबळ चौक येथील संजीवनी हॉस्पिटल येथे गेले. त्यांनी हॉस्पिटलचे दुसऱ्या व्यक्तीच्या नावे असलेले तसेच मेडिकलचे वीजकनेक्शन बिल थकीत असल्याने तोडले. या वेळी संजय गव्हाणे व गीतांजली गव्हाणे यांनी विद्युत कर्मचाऱ्यांशी हुज्जत घालून दमदाटी केली.
दरम्यान, याचवेळी संजीवनी हॉस्पिटलचे संचालक डॉ. ज्ञानेश्वर टेमक यांच्या महाबळेश्वरनगर येथील घराचे बिल थकलेले असल्याने बिल भरण्याबाबत विनंती केली असता हॉस्पिटलमधील कर्मचारी विनायक साबळे हा विद्युत अधिकारी व कर्मचारी यांच्याशी वाद घालू लागला. यावेळी तेथे जमलेल्या व्यक्तींनी सर्व कर्मचाऱ्यांना शिवीगाळ करत अडवून धरले. याचवेळी डॉ. ज्ञानेश्वर टेमक हे त्या ठिकाणी आले व अचानकपणे विद्युत वितरण विभागाचे सहायक अभियंता गणेश वगरे यांना शिवीगाळ, दमदाटी करत याचा कार्यक्रमच करू असे म्हणून गणेश वगरे यांना धक्काबुक्की करत खाली पाडून मारहाण केली.
यावेळी शेजारील संजय गव्हाणे, गीतांजली गव्हाणे, विनायक साबळे व एका अनोळखी व्यक्तीने हाताने व लाथाबुक्क्यांनी मारहाण करत त्यांना हॉस्पिटलमध्ये ओढत नेले. इतर विद्युत कर्मचाऱ्यांनी गणेश वगरे यांची सुटका केली. दरम्यान, सर्वांनी विद्युत वितरण विभागाच्या महिला कर्मचाऱ्यांना देखील शिवीगाळ, दमदाटी केल्याची घटना घडली. याबाबत शिक्रापूर विद्युत वितरण विभागाचे सहायक अभियंता गणेश तुकाराम वगरे (वय ३४, रा. शिक्रापूर ता. शिरूर जि. पुणे, मूळ रा. पांढरेवाडी ता. पंढरपूर जि. सोलापूर) यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली.