जुन्या भांडणावरून दुकानदाराच्या पत्नीला मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 12, 2021 04:13 AM2021-09-12T04:13:50+5:302021-09-12T04:13:50+5:30

भाम येथील थरार, शिरोलीच्या दहा हल्लेखोरांवर गुन्हा दाखल चाकण : जुन्या भांडणाच्या कारणावरून बेकायदेशीर जमाव जमवून शिवीगाळ, दमदाटी ...

Beating shopkeeper's wife over old quarrel | जुन्या भांडणावरून दुकानदाराच्या पत्नीला मारहाण

जुन्या भांडणावरून दुकानदाराच्या पत्नीला मारहाण

googlenewsNext

भाम येथील थरार,

शिरोलीच्या दहा हल्लेखोरांवर गुन्हा दाखल

चाकण : जुन्या भांडणाच्या कारणावरून बेकायदेशीर जमाव जमवून शिवीगाळ, दमदाटी करत दुकानदाराच्या पत्नीला हाताने, लाथाबुक्क्यांनी जबर मारहाण करून तिला जिवे ठार मारण्याच्या उद्देशाने तिच्यावर लाकडी दांडक्याने व लोखंडी गजाने प्राणघातक हल्ला केल्याचा विचित्र प्रकार समोर आला आहे. पुणे - नाशिक महामार्गावरील वाकी लगतच्या संतोषनगर, भाम ( ता. खेड ) गावच्या हद्दीतील कर्ण सुपर मार्केट दुकानासमोर गुरुवारी (दि. ९) सकाळी साडे दहा वाजण्याच्या दरम्यान ही घटना घडली. चाकण पोलिसांनी याप्रकरणी शिरोली (ता. खेड) येथील दहा हल्लेखोरांवर शुक्रवारी (दि. १०) गुन्हा दाखल केला.

गुलाब बाबूराव कड (वय ५७, रा. संतोषनगर, भाम, ता. खेड) यांनी याप्रकरणी फिर्याद दिली. त्यांची पत्नी या हल्ल्यात गंभीर जखमी झाल्या आहेत. कड यांच्या फिर्यादीवरून वैभव शिवेकर, प्रमोद सावंत, विनायक सावंत, गुलाब शिवेकर, कुमार शिवेकर, अक्षय शिवेकर, सोमनाथ सावंत गुलाब शिवेकर यांची पत्नी (नाव समजले नाही.) व अन्य अनोळखी दोन महिला अशा एकूण दहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुलाब कड यांचे संतोषनगर, भाम येथे दुकान आहे. जुन्या भांडणाच्या कारणावरून गुरुवारी साडेदहा वाजण्याच्या दरम्यान वरील लोकांनी दुकानाच्या समोर येऊन बेकायदेशीरपणे जमाव जमवून राडा केला.

वैभव शिवेकर याने या वेळी गुलाब कड यांच्या पत्नीस शिवीगाळ, दमदाटी करत लाकडी दांडक्याने जबर मारहाण केली. तर, प्रमोद सावंत याने हातातील लोखंडी गजाने संबंधित महिलेच्या डोक्यात, पाठीवर, हातावर अमानुषपणे मारहाण करून गंभीर जखमी केले. तसेच घटनास्थळावर जमावात सहभागी असलेल्या शिरोलीतील अन्य लोकांनी संबंधित महिलेला शिवीगाळ, दमदाटी करत हाताने व लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली.

चाकण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अमोल डेरे व त्यांचे अन्य सहकारी याप्रकरणी अधिक तपास करीत आहेत.

Web Title: Beating shopkeeper's wife over old quarrel

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.