Kasba By Election: पैशांचे पाकीट न घेतल्याने कुटुंबाला मारहाण; भाजप माजी नगरसेवकावर गुन्हा दाखल
By विवेक भुसे | Published: February 26, 2023 03:29 PM2023-02-26T15:29:28+5:302023-02-26T15:31:31+5:30
कसबा पेठ पोटनिवडणुकीत पैशांचे पाकीट न घेतल्याच्या कारणावरुन भाजपचे माजी नगरसेवक व त्यांच्या साथीदारांनी एका कुटुंबाला बेदम मारहाण केली.
पुणे : कसबा पेठ पोटनिवडणुकीत पैशांचे पाकीट न घेतल्याच्या कारणावरुन भाजपचे माजी नगरसेवक व त्यांच्या साथीदारांनी एका कुटुंबाला बेदम मारहाण केली. यावरुन गंजपेठेत शनिवारी रात्री जोरदार राडा झाला. मध्यरात्रीपर्यंत दोन्ही गटातील लोक गंजपेठ पोलीस चौकीसमोर ठाण मांडून बसले होते. पोलिसांनी दोन्ही गटातील २५ ते ३० जणांवर गुन्हा दाखल केला.
याबाबत निता किशन शिंदे (वय ४२, रा. गंज पेठ) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी विष्णु हरीहर, निर्मल हरीहर, हीरा हरीहर व इतर १५ ते १६ जणांवर गुन्हा दाखल केला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी या घरी असताना विष्णु हरीहर तसेच इतर १५ ते १६ जणा आले. फिर्यादी यांनी पैशांचे पाकीट न घेतल्याच्या कारणावरुन त्यांचा भाऊ कुणाल यास धक्काबुक्की केली. तुला लय माज आलाय का, तुझ्या घरी खायला नाही, असे म्हणून जातीवाचक शिवीगाळ केली. तसेच त्याच्याबरोबर आलेल्या लोकांनी कुणाल याला लाकडी फळीने मारले व सावधान मित्र मंडळाच्या मागे मोकळ्या पटांगणात फिर्यादीच्या मावशीच्या हातावर, पोटावर ठोसा मारला. फिर्यादी सोडविण्यास गेल्यावर त्यांनाही मारहाण केली. ही घटनेची माहिती मिळताच महाविकास आघाडीचे कार्यकर्ते गंजपेठ पोलीस चौकीसमोर जमले. त्यांनी ॲट्रासिटीखाली गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती. त्यानंतर पहाटे साडेतीन वाजता गुन्हा दाखल करण्यात आला.
याविरोधात हिरालाल नारायण हरीहर (वय ६७, रा. गंज पेठ) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी विशाल कांबळे, निहाल कांबळे, गोविंद लोंढे, आकाश भोसले, सनी नाईक व इतर १० ते १५ जणांवर गुन्हा दाखल केला आहे. फिर्यादी हे रात्री साडे अकरा वाजता सावधान मित्र मंडळाजवळ मारुतीचे दर्शन घेऊन घरी जात असताना विशाल कांबळे याने इकडे कशाला आलास, असे म्हणून जातीवाचक शिवीगाळ केली. फिर्यादी हे त्यांना समजावून सांगत असताना इतरांनी धक्काबुक्की केली. व ओढत पटांगणात नेऊन हाताने लाकडी फळीने मारण्यात सुरुवात केली. डोक्यात मारहाण करुन प्लास्टीकचे खुर्चीने मारहाण केली. फिर्यादी यांनी मदतीसाठी आरडाओरड केला असता याला सोडायचे नाही, असे बोलून धमकी दिली.
या घटनेची माहिती मिळताच सहायक पोलीस आयुक्त रमाकांत माने, वरिष्ठ पोलीस निरीक्षक संगिता यादव, पोलीस निरीक्षक राजेश तटकरे, उपनिरीक्षक राहुल जोग यांनी भेट दिली. या संपूर्ण प्रकाराने पहाटेपर्यंत गंजपेठ परिसरात गोंधळाचे वातावरण होते. पोलिसांनी जादा कुमक मागवून बंदोबस्त वाढला आहे.