जमीन नावावर करण्यासाठी शेतक-याला मारहाण; हिंदूराष्ट्र सेनेचा अध्यक्ष धनंजय देसाईला अटक
By नम्रता फडणीस | Published: August 2, 2023 09:22 PM2023-08-02T21:22:18+5:302023-08-02T21:23:05+5:30
धनंजय देसाईच्या नावावर जमीन केली नाहीस तर तुझ्यासहित कुटुंबाला मारून टाकेन, शेतकऱ्याला दिली धमकी
पुणे : जमीन नावावर करण्यासाठी एका शेतक-याला मारहाण केल्याप्रकरणी हिंदूराष्ट्र सेनेचा अध्यक्ष धनंजय देसाईसह त्याच्या साथीदारांना पौड पोलिसांनीअटक केली. न्यायालयाने देसाईला ९ आॅगस्ट पर्यंत पोलीस कोठडी दिली आहे.
यासंदर्भात प्रदीप बलकवडे यांनी फिर्याद दिली आहे. बलकवडे यांची व धनंजय देसाई यांची शेतजमीन पौड मुळशी येथे शेजारी शेजारी आहे. धनंजय देसाई साथीदार यांना फियार्दी यांची जागा ताब्यात घेऊन सदर जागेवर बांधकाम करायचे होते त्यामुळे काही दिवसांपूर्वी धनंजय देसाई यांनी फियार्दीस धमकी दिली होती, त्यानंतर फिर्यादी हे त्यांच्या मित्रांसमवेत नातेवाईकाच्या घरात बसलेले असताना आरोपी व त्यांचे इतर साथीदार यांनी आपापसात संगनमत करून धनंजय देसाई यास जमीन लिहून देण्याचे कारणावरून बेकायदा गर्दी जमाव जमवून घरातून फिर्यादी याना बाहेर ओढत आणून ’ तू तुझी जमीन धनंजय देसाई यास लिहून का दिली नाहीस तर तुला व तुझ्या कुटुंबाला खल्लास करून टाकण्यास आम्हाला सांगितले आहे’ अशी दमदाटी शिवीगाळ करून शाम सावंत याने पिस्तुल दाखवून व इतरांनी तलवार, लोखंडी रॉड काठ्यांनी फियार्दी यास जीवे मारण्याच्या उद्देशाने डोक्यात मारहाण केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
फिर्यादी यांनी पौड पोलीस स्टेशन येथे सर्व आरोपींविरुद्ध भा.द.वि कलम ३०७ नुसार व इतर कलमांनुसार गुन्हा दाखल केला. पौड पोलीस स्टेशन चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनोजकुमार यादव हे पुढील तपास करीत आहेत. आरोपीना अटक करून न्यायाधीश एस. जी. बरडे यांच्यासमोर हजर करण्यात आले. सरकार पक्षातर्फे सरकारी वकील निलेश लडकत यांनी बाजू मांडली. गुन्हा हा गंभीर स्वरूपाचा आहे त्याचे स्वरूप पाहून न्यायालयाने देसाई याला 9 ऑगस्ट पर्यंत पोलीस कोठडी सुनावली.