वाद मिटविण्यासाठी आलेल्या पोलिस कर्मचाऱ्यालाच मारहाण; पुण्यातील घटना
By ऑनलाइन लोकमत | Published: November 16, 2022 05:26 PM2022-11-16T17:26:23+5:302022-11-16T17:27:28+5:30
रात्री सार्वजनिक रोडवर सुरू असलेली भांडणे पाहून तेथून जाणाऱ्या नागरिकाने पोलिस नियंत्रण कक्षाला याची माहिती दिली होती
पुणे : भर रस्त्यात पतिपत्नीचा वाद सुरू असल्याने, त्यांना समजावून सांगण्यासाठी पाेलिस कर्मचारी तेथे गेले. त्यावेळी वाद बाजूला राहिला आणि त्या पोलिस कर्मचाऱ्यालाही मारहाण करण्याचा प्रकार हिंगणे होम कॉलनीत घडला. या प्रकरणी वारजे पोलिसांनी गोविंद नागनाथ सुरवसे (वय ३५, रा.मुर्टा नळदुर्ग, ता.तुळजापूर, जि.उस्मानाबाद) याला अटक केली आहे.
याबाबत पोलिस नाईक सागर जगताप यांनी वारजे पोलिसांकडे फिर्याद दिली. हा प्रकार हिंगणे होम कॉलनीकडे जाणाऱ्या सार्वजनिक रोडवर सोमवारी रात्री सव्वादहा वाजता घडला.
अधिक माहितीनुसार, गोविंद सुरवसे याचे पत्नी सायली सुरवसे याच्याबरोबर घटस्फोटावरून हिंगणे होम कॉलनीतील सार्वजनिक रोडवर भांडणे सुरू होती. इतक्या रात्री सार्वजनिक रोडवर सुरू असलेली भांडणे पाहून तेथून जाणाऱ्या नागरिकाने पोलिस नियंत्रण कक्षाला याची माहिती दिली.
त्यानुसार, सागर जगताप व पोलिस शिपाई चव्हाण हे घटनास्थळी पोहोचले. त्यांनी गोविंद सुरवसे याला समजावून सांगत असताना, त्याने फिर्यादी यांची कॉलर पकडून त्यांना ढकलून देऊन हाताने मारहाण करत जीवे मारण्याची धमकी दिली. त्यानंतर, पोलिसांनी त्याला दुचाकीवर बसवून पोलिस चौकीत नेण्याचा प्रयत्न केला असताना, त्याने दुचाकीला लाथा मारून शिवीगाळ करीत सरकारी कामात अडथळा आणला. या प्रकरणी त्याला अटक केली आहे. पोलिस उपनिरीक्षक सावंत तपास करीत आहेत.