Pune | सावत्र आईकडून चटके, मारहाण; पाच वर्षाच्या मुलीचा मृत्यू; पुण्यातील धक्कादायक घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2023 19:53 IST2023-02-24T19:52:56+5:302023-02-24T19:53:25+5:30
पाच वर्षांच्या मुलीला चटके देऊन मारहाण करीत तिचा खून...

Pune | सावत्र आईकडून चटके, मारहाण; पाच वर्षाच्या मुलीचा मृत्यू; पुण्यातील धक्कादायक घटना
पुणे : एनडीए रस्त्यावरील शिवणे भागात सावत्र आईनेच पाच वर्षांच्या मुलीला चटके देऊन मारहाण करीत तिचा खून केला. या प्रकरणी उत्तमनगर पोलिसांनी सावत्र आईला अटक केली. श्वेता राजेश आनंद (५) असे खून झालेल्या बालिकेचे नाव आहे. या प्रकरणी सावत्र आई रितिका राजेश आनंद (३५, रा. धावडे इमारत, शिवणे, एनडीए रस्ता) हिला अटक केली. पोलिस हवालदार घोलप यांनी या संदर्भात उत्तमनगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
राजेश आनंद एका खासगी कंपनीत काम करतात. आजारपणामुळे राजेशच्या पहिल्या पत्नीचा मृत्यू झाला होता. राजेशला पाच वर्षांची मुलगी आहे. तिचे संगोपन करण्यासाठी राजेशने रितिकाशी दुसरा विवाह केला. श्वेताला आईची आठवण आल्याने ती रडायची. तीन दिवसांपूर्वी तिने श्वेताच्या डोक्यात कठीण वस्तू मारली. तिला चटके दिले. मारहाणीत श्वेताचा शुक्रवारी मृत्यू झाला.
रितिका ही श्वेताला घेऊन खासगी रुग्णालयात गेली. श्वेताला फिट आल्याने ती बेशुद्ध पडल्याची बतावणी तिने डॉक्टरांकडे केली. वैद्यकीय तपासणीत श्वेताचा मृत्यू झाल्याचे उघडकीस आले. श्वेताच्या शरीरावर मारहाण तसेच चटके दिल्याच्या खुणा आढळून आल्या. डॉक्टरांना संशय आल्याने त्यांनी या घटनेची माहिती पोलिसांना दिली.
पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तपासणीत श्वेता हिचा मृत्यू मारहाण, चटके दिल्याने झाल्याचे उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी श्वेताच्या सावत्र आईला चौकशीसाठी ताब्यात घेतले. चौकशीत तिने सुरुवातीला उडवाउडवीची उत्तर दिल्याने पोलिसांचा संशय बळावला. चौकशीत तिने श्वेता सारखी त्रास देत असल्याने तिचा खून केल्याची कबुली तिने दिली. उत्तमनगर ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील जैतापूरकर तपास करत आहेत.