हुतात्मा विष्णू पिंगळे स्मारकाचे सुशोभीकरण रखडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 2, 2021 04:10 AM2021-01-02T04:10:33+5:302021-01-02T04:10:33+5:30
तळेगाव ढमढेरे: भारताच्या स्वातंत्र्याकरीता हौतात्म्य पत्करलेले हुतात्मा विष्णू गणेश पिंगळे यांची आज जयंती. मात्र, ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षामुळे दीड दोन ...
तळेगाव ढमढेरे: भारताच्या स्वातंत्र्याकरीता हौतात्म्य पत्करलेले हुतात्मा विष्णू गणेश पिंगळे यांची आज जयंती. मात्र, ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षामुळे दीड दोन वर्षापासून जन्मगावी असलेल्या त्यांच्या स्मारकाचे सुशोभीकरण रखडले आहे. स्थानिकांनी मागणी करुनही याकडे प्रशासनाकडून कानाडोळा करण्यात येत आहे. हुतात्मा विष्णू गणेश पिंगळे हे शिरूर तालुक्यातील तळेगाव ढमढेरे येथील असून त्यांचा जन्मदिन २ जानेवारी १८८९ आहे. शासनाच्या माध्यमातून हुतात्मा विष्णू गणेश पिंगळे यांचे स्मारक उभारले गेल्याने तळेगाव ढमढेरे गावच्या वैभवात निश्चितच भर पडली. सध्या या स्मारकाची देखभाल करण्याची जबाबदारी पूर्णत: ग्रामपंचायत प्रशासनावर आहे. राष्ट्रीय स्मारक दुरूस्ती व देखभाल निधी अंतर्गत सन २००९ ला १० लाख, २०१४-१५ ला २२ लाख रुपयांचा निधी मिळाला त्यानंतर २०१६ ते२०१९ दरम्यान २८ लाख रुपयांचा निधी असा एकूण ६० लाख रुपयांचा निधी या स्मारकाच्या दुरुस्ती, देखभाल व सुशोभीकरणासाठी मिळाल्याचे स्मारक कमिटीचे संचालक प्रमोद फुलसुंदर यांनी सांगितले.
रंगकाम, स्मारकाच्या छतावरील पत्रा बदलणे,संरक्षण भिंत बांधकाम, आकर्षक बगीचा,मुख्य रस्त्यापासून स्मारकापर्यंत आत मध्ये येणारा डांबरी रस्ता,लाईट व्यवस्था, हॉलमध्ये एसी,स्मारकाच्या आतील बाजूस स्वच्छतागृह अशी अनेक कामे सुशोभीकरणातंर्गत करण्यात आली. मात्र, ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षामुळे स्मारकासह परिसराची दुरवस्था झाली आहे. आकर्षक केला गेलेला बगीच्या पूर्ण उद्धवस्त झालेला आहे. विजेचे खांब व दिवे यांची पडझड झालेली आहे. दोन वर्षापासून स्मारक परिसरात वीज बंद आहे. तसेच स्मारकाच्या एका बाजूला संरक्षक भिंत नसल्याने लोखंडी जाळी लावल्यामुळे काही ठिकाणी ही जाळी काढून ग्रामस्थांनी ये-जा करत आहे. स्मारकाच्या मागील बाजूस पत्रे अस्ताव्यस्त पडलेले आहेत. एवढेच नाही तर स्मारकाच्या छताचे पत्रे कुजू लागले असून पावसाळ्यात पाणी झिरपत आहे. अनेक वेळा मुख्य प्रवेशद्वारातच वाहने उभी केल्याने लोकांना आत मध्ये ये-जा करण्यास त्रास होतो. विशेषता स्मारकाची पूर्ण देखभाल ग्रामपंचायत प्रशासनाकडे असताना देखील याकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे. गेल्या दोन महिन्यांपासून ग्रामपंचायतीचा कारभार प्रशासकाच्या हाती आहे. त्यामुळे काही तरी उपाययोजना होतील असे वाटत होते. परंतु, तसे काहीच झाले नाही.
हुतात्मा विष्णू गणेश पिंगळे स्मारकाच्या दुरुस्ती संदर्भात तसेच स्मारक परिसराच्या सुशोभीकरण संदर्भात ग्रामपंचायतीने जिल्हाधिकार्यांकडे लेखी स्वरुपात निधीची मागणी केली आहे. निधी मिळाल्याबरोबर त्वरित कामे केली जातील
- संजय खेडकर ग्रामविकास अधिकारी,ग्रामपंचायत,तळेगाव ढमढेरे
हुतात्मा विष्णू गणेश पिंगळे स्मारकाच्या पाठीमागील बाजूस अस्ताव्यस्त पडलेले लोखंडी पत्रे.
०१ तळेगाव ढमढेरे