पुस्तकाच्या शिल्पाचे सुशाेभीकरण की विद्रुपीकरण? शिल्पकारांचा सवाल

By ऑनलाइन लोकमत | Published: January 11, 2023 02:18 PM2023-01-11T14:18:52+5:302023-01-11T14:19:07+5:30

अजंठा आणि एलोरा येथील शिल्प अशाच पद्धतीने रंगवणार का?

Beautification or Defacement of Book Sculpture The question of sculptors | पुस्तकाच्या शिल्पाचे सुशाेभीकरण की विद्रुपीकरण? शिल्पकारांचा सवाल

पुस्तकाच्या शिल्पाचे सुशाेभीकरण की विद्रुपीकरण? शिल्पकारांचा सवाल

googlenewsNext

पुणे : बालभारतीजवळ उभं करण्यात आलेलं ‘बसाल्ट’मधील पुस्तकांचं शिल्प रंगवून त्याचे ‘ओरिजिनल’पण घालवण्याचं काम पुणे महापालिकेनं केलं आहे. किमान हे करताना शिल्पकाराची परवानगी घेतली होती का?, सुशोभीकरण म्हणजे रंगरंगोटी आहे का? अशा पद्धतीने अजंठा आणि एलोरा येथील शिल्प रंगवणार का? असा सवाल हे शिल्प घडविणारे कलाकार प्रशांत बंगाळ यांनी केला आहे.

महापालिकेने जी २० परिषदेनिमित्त फुटपाथला रंग दिल्यासारखी या शिल्पाला रंगरंगोटी करून विद्रुपीकरण केल्याची बाब समाेर आली आहे. मूळ बसाल्ट स्टोन असलेल्या या शिल्पाला ऑइल पेंटमध्ये रंगवित शिल्पाचे सौंदर्य नष्ट करण्याचा हा प्रताप आहे.

सिम्बायाेसिस, विधी महाविद्यालय आणि भांडारकर प्राच्यविद्या संशोधन मंदिर या सेनापती बापट रस्त्यानजीक असलेल्या शिक्षण संस्थांचे प्रतीक असलेले हे शिल्प पुणे शिक्षणाचे माहेरघर असल्याची प्रचिती देते. सध्या जी-२० च्या निमित्ताने महापालिकेने सुशोभीकरणाची मोहीम हाती घेतली आहे.
याबाबत शिल्पकार प्रशांत बंगाळ यांनी ‘लोकमत’शी बोलताना संताप व्यक्त केला. ते म्हणाले की, पुण्यात २००८ मध्ये राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेदरम्यान महापालिकेने हे शिल्प तयार करून घेतले होते. बसाल्ट ही महाराष्ट्राची ओळख आहे. त्या पाषाणात हे शिल्प साकारले आहे.

रस्त्यावर ज्या पद्धतीने दगडाला रंग दिला जातो. त्या पद्धतीने या शिल्पाला रंग देण्यात आले आहे. रंगवायचेच होते तर फायबरचे पण चालले असते ना? महापालिकेच्या समित्यांमध्ये एखादा कलाकार असता तर त्याने शिल्प कशात रंगवायचे याबाबत सल्ला दिला असता. रस्ते रंगविल्यासारखे शिल्प रंगवून त्याला सुशोभीकरणाचे नाव दिले आहे, असेही ते म्हणाले. याबाबत कला क्षेत्रात नाराजीचे वातावरण आहे.

रंग फासल्याचे दाखविणार का?

रस्त्यावरच्या पेंटरकडून शिल्पाला रंग मारून घेतल्याने आता ते शिल्प खूपच वाईट दिसत आहे. जी २० आंतरराष्ट्रीय परिषदेला जगभरातील लोक येत आहेत. त्यांना दगडाला रंग फासल्याचे शिल्प दाखविणार का? असा प्रश्नही बंगाळ यांनी उपस्थित केला आहे. त्यांना उलट बसाल्टमधले शिल्प अधिक भावले असते. कारण इतर देशातून मंडळी खास एलोरा व अजिंठाची शिल्प बघायला येतात. त्यांना असे घाणेरडे शिल्प दाखविले जाणार आहे.

आता केवळ धर्मांची नावे घालणे बाकी

महापालिकेतील लोकांवर कुणाचा अंकुशच राहिलेला नाही. त्यांना फक्त निविदेची कामे पूर्ण करायची आहेत. त्यासाठी कशीतरी कामे उरकली जात आहेत. त्या पुस्तकाच्या शिल्पाला इतके विचित्र रंग दिले आहेत की आता केवळ धर्मांची नावे घालणे बाकी आहे. - प्रशांत बंगाळ, शिल्पकार

Web Title: Beautification or Defacement of Book Sculpture The question of sculptors

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.