'इंट्रिया' मध्ये अवतरला हिरेजडित कलाविष्कार
By ऑनलाइन लोकमत | Published: October 15, 2019 01:26 PM2019-10-15T13:26:37+5:302019-10-15T13:37:34+5:30
हिऱ्यांच्या दागिन्यांना पुणेकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद : परंपरा आणि आधुनिकतेची गुंफण
पुणे : परंपरा आणि आधुनिकता यांची सुरेख गुंफण... नयनमनोहारी लक्षवेधी दागिने... सौंदर्याची व्याख्या सांगणारे नक्षीकाम आणि ‘अहाहा’ असे उद्गार काढायला लावणारे वैविध्य! ‘इंट्रिया’ प्रदर्शनात या वर्णनाची शब्दश: प्रचिती कलाप्रेमींनी ‘याचि देही, याचि डोळा’ घेतली. स्वर्गीय सौंदर्याची अनुभूती देणाऱ्या जडजवाहिऱ्यांच्या ‘इंट्रिया’ या प्रदर्शनाला दुसऱ्या दिवशीही (रविवारी) उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
प्रसिद्ध ज्वेलरी डिझायनर पूर्वा दर्डा-कोठारी व हिरे व्यापारी हर्निश शेठ यांच्या कल्पनाकौशल्यातून आविष्कृत झालेल्या दागिन्यांचे प्रदर्शन कोरेगाव पार्क येथील ताज ब्ल्यू डायमंड हॉटेल येथे आयोजित करण्यात आले होते. रविवारी सकाळपासूनच अनेकांनी प्रदर्शनाला हजेरी लावली. डोळ्यांचे पारणे फेडणारे वैविध्य सर्वांच्याच औत्सुक्याचा विषय ठरले. लोकमत एडिटोरियल बोर्डाचे चेअरमन विजय दर्डा यांनी सर्वांचे स्वागत केले. यावेळी उषा गांधी, ग्रॅव्हिटस फौंडेशनच्या अध्यक्षा उषा काकडे, सुशीला बंब, ऑल इंडिया काँग्रेस कमिटीच्या मेघालयातील समन्वयक झरिता लैतफ्लांग, प्रसिद्ध उद्योजक युवराज ढमाले आणि वैष्णवी ढमाले, संजय चोरडिया आणि सुषमा चोरडिया, शेखर मुंदडा आणि स्वाती मुंदडा, माधुरी बहादुरी, किन्नरी पंचमिया, शीतल सूर्यवंशी, रितू कर्णिक, मेघना यादव, सिंझानिया रॉड्रिग्ज अशा अनेक मान्यवरांची उपस्थिती होती.
हिरा हे सौंदर्याचे, कलात्मकतेचे आणि समृद्धीचे प्रतीक आहे. आधीच मोहक असलेल्या हिऱ्याला पैलू पाडून कलात्मक दागिने तयार केले तर कुणीही त्याच्या प्रेमात पडल्याशिवाय राहूच शकत नाही.
याच हिरेजडित दागिन्यांनी पुणेकरांना प्रेमात पाडले. त्यांच्यासाठी ‘इंट्रिया’ या प्रदर्शनात हिरे, पाचू, माणिक यांचे आकर्षक दागदागिने, कर्णफुले, बारीक कलाकुसरीने नटलेले नेकलेस, ब्रेसलेट, कडे, पेंडंट्स असे वैविध्यपूर्ण दागिने उपलब्ध करून देण्यात आले होते. पारंपरिक दागिन्यांपासून ते इंडो-वेस्टर्न, पार्टी वेअर अशा स्वरूपाचे दागिने या प्रदर्शनात सादर करण्यात आले होते. बारीक हिऱ्यांचे काम, नाजूकपणा आणि त्यातही जपलेला साधेपणा या गोष्टींमुळे कलेक्शनला सर्वांची पसंती मिळाली. ग्राहकांना तांत्रिकतेने परिपूर्ण आंतरराष्ट्रीय स्तरावरील दर्जेदार डिझाईन्स उपलब्ध करून देण्यासाठी हे दागिने एकमेवाद्वितीय असून, परिधान करण्यासदेखील सोपे आहेत. प्रत्येक दागिने तयार करताना आधुनिकतेसोबतच पारंपरिक आणि समकालीन भारतीय डिझाईनवरदेखील भर देण्यात आला आहे. गुणवत्ता, डिझाईन, रचनाकौशल्यामुळे अनेकांनी आवर्जून दागिन्यांची खरेदी केली. प्रदर्शनात दर वर्षी नावीन्य, वेगळेपणा आणि सर्जनशीलता जाणवत असल्याचे मत दागिनेप्रेमींनी व्यक्त केले.
.......
प्रदर्शनामध्ये दागिन्यांमध्ये खूप सुंदर, नयनमनोहारी असे वैविध्य आहे. एरवी पाहायला न मिळणारी डिझाइन्स इथे गवसतात. परंपरा आणि आधुनिकतेचा संगम इंट्रियामध्ये पाहायला मिळतो. विशेषत: ब्रेसलेटमधील वैविध्य, नक्षीकाम डोळ्यांचे पारणे फेडणारे आहे. स्त्रियांचा दागिन्यांचा शोध इथे नक्की पूर्ण होईल, असा विश्वास वाटतो.- वैष्णवी युवराज ढमाले
........
‘अत्युत्तम’, ‘सर्वोत्कृष्ट’ असेच प्रदर्शनाचे वर्णन करावे लागेल. पूर्वा दर्डा-कोठारी यांनी अत्यंत कल्पकतेने दागिन्यांचे डिझाइन केले आहे. त्यांची कामातील समर्पण वृत्ती, मेहनत दागिने पाहिले की जाणवते. प्रत्येक वेळी नेहमीच्या चौकटीत राहून प्रचलित डिझाइन बनवणे आवश्यक नसते. कलाकाराची दृष्टी त्यापलीकडे जात असते. हाच कलाविष्कार म्हणजे इंट्रिया असे म्हणता येईल.- माधुरी बहादुरी
......
इंट्रिया हे खूप सुंदर प्रदर्शन आहे. प्रत्येक डिझाईन अत्यंत बारकाईने आणि विचारपूर्वक तयार करण्यात आले आहे. तरुणांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आकर्षित करणारे वैविध्य प्रदर्शनात जोपासण्यात आले आहे. कोणाला काय शोभेल, याचा बारकाईने विचार करण्यात आला आहे. प्रदर्शन मनापासून आवडेल, असेच आहे.- उषा काकडे
..........
युरोपियन दागिन्यांनी माझे लक्ष वेधून घेतले. नवीन पिढीसाठी हे दागिने खूपच सुंदर आणि शोभून दिसणारे आहेत. मला चंकी रिंग खूप जास्त आवडल्या. ब्रेसलेट, रिंग, इयररिंग असे सर्वच प्रकार खूप सुंदर आहेत.- किन्नरी पंचमिया
..........
आम्ही दोघेही गेल्या चार वर्षांपासून इंट्रिया या प्रदर्शनाला न चुकता भेट देत आहोत. प्रदर्शनसाठी मुंबईलाही गेलो होतो. येथील दागिने मनाला भुरळ घालणारे आहेत. नेमका ट्रेंड ओळखून दागिन्यांची मांडणी केली असल्याने निवड करणे सोपे जाते. दागिन्यांमध्ये कमालीचे वैविध्य आहे. त्यामुळे नेहमी खरेदी करायला मजा येते. दर्डा परिवाराशी कौटुंबिक संबंध आहेतच; मात्र, प्रदर्शन खऱ्या अर्थाने दर्जेदार असल्याने भेट न देता राहवतच नाही.- स्वाती शेखर मुंदडा.
...........