कोशाच्या जादुई दुनियेतून उमलते सुंदर फुलपाखरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2021 04:08 AM2021-05-31T04:08:33+5:302021-05-31T04:08:33+5:30
पुणे : एका फुलावरून दुसऱ्या फुलावर भिरभिरणारी फुलपाखरे आपल्या हृदयाचा ठाव घेतात. फुलपाखरू जसे सुंदर असते, तेवढाच सुंदर ...
पुणे : एका फुलावरून दुसऱ्या फुलावर भिरभिरणारी फुलपाखरे आपल्या हृदयाचा ठाव घेतात. फुलपाखरू जसे सुंदर असते, तेवढाच सुंदर त्याचा जीवनप्रवास असतो. एका लहान अंड्यापासून ते सुंदर फुलपाखरापर्यंतचा प्रवास एक विलक्षण अनुभव असतो. अशीच एक फुलपाखराची जीवन अवस्था म्हणजे कोश. कॉमन क्रो फुलपाखरू स्थानिक स्थलांतर करतात आणि त्यामुळे विविध प्रकारच्या वातावरणामध्ये त्यांचा आढळ असतो, अशी माहिती फुलपाखरू अभ्यासक आणि फर्ग्युसन महाविद्यालयाचा विद्यार्थी रजत जोशी याने दिली.
अळी जेव्हा तिच्या खाद्यवनस्पतीची पाने खाऊन एका विशिष्ट आकाराला पोहोचते, तेव्हा ती खाणे बंद करते. तिच्या मोठ्या आकाराचे आकुंचन करून ती एका धाग्याच्या साहाय्याने पानाच्या खालच्या बाजूस लटकते. त्यानंतर आकुंचन प्रसारण करून ती स्वतःभोवती एक कोश निर्माण करते. हे कोश अगदी वेगवेगळ्या आकाराचे, सुंदर आकाशकंदील सारखे दिसतात.
कॉमन क्रो ह्या फुलपाखराचा कोशही अतिशय सुंदर असतो. हे फुलपाखरू भुरे-काळ्या रंगाचे असून हवेत सुंदर तरंगल्यासारखी त्याची उडायची शैली असते. मादी ही कन्हेर, उंबर ह्या झाडांवर अंडी घालते, ज्यातून ३-४ दिवसांत एक छोटी अळी बाहेर पडते. ही अळी कन्हेर, उंबर अशा झाडांची पानं खाऊन विषारी द्रव्ये आपल्या अंगात साठवून ठेवते. त्यामुळे ही त्यांच्या भक्षकांसाठी विषारी ठरते.
भक्षकांपासून वाचतो कॉमन क्रो
कॉमन क्रो फुलपाखरांना भक्षक खाऊ शकत नाहीत. त्यामुळे काही फुलपाखरं भक्षकांना बळी पडतात. उदा. मलबार दावेन, सिलोन, पामफ्लाय इत्यादी फुलपाखरं स्वत:ला कॉमन क्रोसारखं रंगरूप घ्यायचा प्रयत्न करीत असतात. ते भक्षकांपासून स्वत:चे संरक्षण करून घेण्यासाठी असे करतात. त्याला बरेसियन मिमिक्री असं म्हटलं जातं. फुलामधील मधाबरोबरच कुजणाऱ्या पालापाचोळ्यामधील रसही ही फुलपाखरं शोषून घेतात, असे रजत जोशी म्हणाला.
अळी ही जीवन अवस्था २१ दिवसांसाठी टिकून राहते आणि नंतर ही अळी स्वतःभोवती एक सुंदर कोश करते. कोशाच्या आतील अळी जशी फुलपाखरामध्ये रूपांतरीत होऊ लागते, तसे कोशाचे रंग बदलतात. तब्बल १३-१४ दिवसांनी त्यातून एक सुंदर फुलपाखरू बाहेर येते.
- रजत जोशी, फुलपाखरू अभ्यासक