स्वराज्याच्या प्रवेशद्वाराने वाढली सिंहगडाची शोभा

By ऑनलाइन लोकमत | Published: October 15, 2019 11:20 AM2019-10-15T11:20:56+5:302019-10-15T11:23:10+5:30

गेल्या अनेक महिन्यांपासून पुणे दरवाजाच्या कमानीला सागवानी दार बसविण्यासाठी शासकीय परवानगी घेण्याचे काम सह्याद्री प्रतिष्ठानकडून सुरु होते.

the beauty increased of sinhgad fort due to new entrance door | स्वराज्याच्या प्रवेशद्वाराने वाढली सिंहगडाची शोभा

स्वराज्याच्या प्रवेशद्वाराने वाढली सिंहगडाची शोभा

googlenewsNext
ठळक मुद्देदाराची उंची साधारण सात फूट असून, पाच फूट लांबराज्य पुरातत्त्व विभाग, वन विभाग आणि डेरा ग्रामपंचायतीच्या ना हरकत प्रमाणपत्रानंतर दुर्गार्पण

पुणे : छत्रपती शिवरायांच्या मावळ्यांच्या पराक्रमाची साक्ष देणारा कोंढाणा अर्थात किल्ले सिंहगडाची शोभा आणि सुरक्षितता आता आणखी वाढली आहे. निमित्त आहे ते सिंहगडामध्ये प्रवेश करताना लागणाऱ्या पुणे दरवाजाच्या कमानीला लावण्यात आलेल्या सागवानी भव्य दारामुळे.
सह्याद्री प्रतिष्ठानच्या वतीने गडावरील पुणे दरवाजाला सागवानी दार बसविण्यात आले. त्याचा दुर्गार्पणाचा सोहळा रविवारी सकाळी गडावर रंगला. द्वाराच्या दुर्गार्पणाच्या सोहळ्याला स्वराज्यरक्षक संभाजी या मालिकेतील अभिनेते अजय तापकिरे, आनंद काळे आणि  पल्लवी वैद्य उपस्थित होेते.
गेल्या अनेक महिन्यांपासून पुणे दरवाजाच्या कमानीला सागवानी दार बसविण्यासाठी शासकीय परवानगी घेण्याचे काम सह्याद्री प्रतिष्ठानकडून सुरु होते. राज्य पुरातत्त्व विभाग, वन विभाग आणि डेरा ग्रामपंचायतीच्या ना हरकत प्रमाणपत्रानंतर रविवारी दार बसवून त्याचे दुर्गार्पण करण्यात आले. या दाराची उंची साधारण सात फूट असून, पाच फूट लांब आहे. राज्य शासनाच्या पुरातत्त्व विभागाच्या अधिकृत कंत्राटदाराकडून हा सागवानी दरवाजा तयार करण्यात आला असून, त्याला समोरच्या बाजूला मोठे खिळे लावण्यात आले आहेत. त्यामुळे या दाराला इतिहासकालीन रूप आले आहे. दुर्गार्पण सोहळ्याच्या निमित्ताने गडाला विविध फुलांच्या माळांनी सजविण्यात आले होते. या सोहळ्यानिमित्त नाशिक, धायरी आणि वारजे येथील तीन ढोलपथक आले होते. तर मुंबईहून खास मावळ्यांच्या वेशभूषेतील तुतारीवादक आले होते. तुतारीचा निनाद केल्यावर हे सागवानी दार उघडण्यात आले आणि गडाच्या आतून छत्रपतींच्या वेशभूषेतील पाहुणे पायऱ्या उतरून खाली आले. या वेळी उपस्थितांनी भंडारा उधळून ऐतिहासिक पद्धतीने गडाचे दुर्गार्पण केले.
या वेळी सहायक पोलीस आयुक्त भानुप्रताप बर्गे, पुरातत्त्व विभागाचे सहायक संचालक विलास वहाने,  कुणाल साठे, सह्याद्री प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्रमिक गोजमगुंडे, सुशांत मोकाशी, रोहित मते, पांडुरंग मते, अक्षय उंडरे, नागेश जाधव, सिद्धेश कानडे, सरपंच रेखा खाटपे, अमोल पढेर आदी उपस्थित होते. 
.............
गडावर मोफत प्रवेश...
एरवी वाहनाने गडावर जाण्यासाठी वन विभागाकडून कर आकारला जातो. मात्र आज कार्यक्रमानिमित्त राज्यभरातून येणाऱ्या गाड्यांना गडावर मोफत प्रवेश देण्यात आला. विशेष म्हणजे वन विभाग आणि वाहतूक पोलिसांच्या जागोजागी असलेल्या बंदोबस्तामुळे पायथ्यापासून गडापर्यंत एकाही ठिकाणी वाहतूककोंडी झाली नाही. या वेळी सह्याद्री प्रतिष्ठानच्या वतीने दीड हजार गडप्रेमींसाठी भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती.

Web Title: the beauty increased of sinhgad fort due to new entrance door

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.