पुण्यात इंजिनिअरिंगसाठी आलेला जळगावचा विद्यार्थी बनला पिस्तूल तस्कर; ८ पिस्तुले हस्तगत
By ऑनलाइन लोकमत | Published: March 11, 2021 07:13 PM2021-03-11T19:13:32+5:302021-03-11T19:20:46+5:30
जळगावच्या विद्यार्थ्यासह चौघांना अटक
पुणे : पुण्यात इंजिनिअरिंगसाठी आलेला तरुण पिस्तुल तस्कर बनल्याचा प्रकार गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाने उघडकीस आणला आहे. मध्य प्रदेशातून पिस्तुले घेऊन तो पुण्यातील गुन्हेगारांना गेली ४ वर्षे विक्री करत होता.त्याच्यासह पोलिसांनी चौघांना अटक केली असून त्यांच्याकडून साडेचार लाख रुपयांची ८ पिस्तुले आणि १५ जिवंत काडतुसे जप्त केली असल्याची माहिती पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी दिली.
मुख्य सुत्रधार भूषण महेश मराठे (वय २३, रा. अरूणनगर, चोपडा, जि. जळगाव), राहुल चंद्रकांत पवार (२६), तौफीक गुलाब शेख (वय २५, रा. कामगार पुतळा, शिवाजीनगर) आणि राम गोरोबा जाधव (वय ३५, रा. दांडेकर पूल, पुणे) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. पवार याच्यावर राजगड पोलिस ठाण्यात ५ गंभीर स्वरूपाचे तर जाधव याच्यावर राजगड पोलिस ठाण्यात खुनाचा एक गुन्हा दाखल आहे.
शहरात शस्त्रविक्री करणाऱ्यांचा डाटा संकलित करुन त्यांच्याकडे तपास करण्याचे आदेश पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी दिला होता. खंडणी विरोधी पथक दोन शहरातील पिस्तूल प्रकरणांचा डाटा संकलीत करून तपास करीत असताना पोलिस अंमलदार सचिन अहिवळे यांना माहिती मिळाली. जळगाव येथून एक जण देशी बनावटीचे पिस्तुल विक्रीसाठी पुण्यात येणार असल्याचे समजले.
त्यानुसार पुणे रेल्वे स्टेशन परिसरात पथकाने सापळा लावून भूषण मराठे याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे ३ पिस्तुले, ६ जिवंत काडतुसे मिळाली. त्याच्याकडे अधिक तपास केल्यानंतर पुण्यात इंजिनिअरिंगचे शिक्षण घेत असताना तो इतर आरोपींच्या संपर्कात आल्याचे सांगितले. त्याचे जळगाव जिल्ह्यातील चोपडा गाव हे मध्यप्रदेश सीमेपासून १५ ते २० किमी अंतरावर आहे. तेथूनच १० ते १५ हजार रूपयांना पिस्तुले विकत घेऊन तो पुणे शहरात ती पिस्तुले ३० ते ५० हजार रूपयांपर्यंत विकत होता असे सांगण्यात आले.