'...कारण आता माझं वय देखील ८४ झालं आहे", शरद पवार यांनी व्यक्त केले मत

By ऑनलाइन लोकमत | Published: March 10, 2024 07:49 PM2024-03-10T19:49:39+5:302024-03-10T19:50:03+5:30

'वय झालं म्हणून थकायचं नाही, वय झालं म्हणून विचार सोडायचा नाही. आपण चालत राहू एवढीच खूणगाठ बांधा'

'...because now my age has also turned 84", expressed Sharad Pawar | '...कारण आता माझं वय देखील ८४ झालं आहे", शरद पवार यांनी व्यक्त केले मत

'...कारण आता माझं वय देखील ८४ झालं आहे", शरद पवार यांनी व्यक्त केले मत

बारामती - 'आता ज्येष्ठांच्या ओळीत मी पण बसतो, कारण आता माझं वय ८४  झालं आहे. जेष्ठ नागरिकांचे प्रश्न जाणून घेतले पाहिजेत. ज्येष्ठ नागरिकांचा मोठा वर्ग असून देशाच्या उभारणीत यांचा मोठा वाटा आहे. नव्या पिढीला ज्ञान देणारे घटक म्हणून तुमच्याकडे पाहिले जाते’, असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख, ज्येष्ठ नेते  शरद पवार यांनी व्यक्त केले . रविवारी (दि. १०)सायंकाळी ते बारामती येथील ज्येष्ठ नागरिक संघाच्या अनौपचारिक कार्यकमात बोलत होते. यावेळी त्यांनी ज्येष्ठ नागरीकांसमवेत संवाद साधत जुन्या आठवणींना उजाळा दिला.

पवार पुढे म्हणाले, वय वाढले हे ठीक आहे, परंतू वय वाढलं आणि आपण जेष्ठत्वाकडे झुकलो तरी कदाचित आपले पाय दुखतील, गुडघे दुखतील, दात दुखतील, पण त्याचा आपल्या डोक्यावर परिणाम होत नाही, म्हणजेच मेंदूवर परिणाम होत नाही. हा मेंदू जोपर्यंत सशक्त आहे, तोपर्यंत आपल्याला या वय वाढण्याचे, चिंता करण्याचे कारण नाही. जेष्ठ नागरिक हे समाजाचा ठेवा आहेत. तो ठेवा असाच जपण्याची गरज आहे, असं मत पवार यांनी व्यक्त केले.

ते पुढे म्हणाले, आपल्याकडे आधी कापसाच्या जिनिंग मिल होत्या, तसंच अनेक गुऱ्हाळे होती. त्यानंतर जाचक, घोलप माझे वडील असतील आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी छत्रपती कारखान्याची उभारणी केली. त्यानंतर सोमेश्वर कारखाना मुकुटराव काकडे यांनी स्थापन केला, त्यानंतर माळेगाव कारखाना सुरू झाला आणि या दरम्यानच्या काळामध्ये येथील गुऱ्हाळे गेली आणि कारखानदारी वाढीस लागली आणि इथून सगळे परिस्थिती बदलण्यास सुरवात झाल्याचे पवार म्हणाले.

सुरुवातीला फक्त एम.ई.एस संस्थेची शाखा होती. त्यानंतरच्या काळामध्ये विद्या प्रतिष्ठान शारदानगरचे कृषी विकास प्रतिष्ठान त्यानंतर माळेगावचं इंजिनिअरिंग कॉलेज, सोमेश्वरचे इंजिनिअरिंग कॉलेज सुरू झाले आणि शिक्षणाने परिस्थिती बदलली. पुण्यानंतर ज्ञानाचे केंद्र बारामती हे झाले. त्यानंतर आपण येथे एमआयडीसी सुरू केली. प्रक्रिया करणारे उद्योग या ठिकाणी सुरू झाल्याची आठवण पवार यांनी सांगितली.

तो काळ असा होता की समोर कोणीही आले तर त्याचे नाव माहिती असायचे, आता  टक्के लोक ओळखू येत नाहीत. कारण अनेक लोक इथे बाहेरून आले त्यांनी बारामतीला आपले मानले आणि बारामतीचा लौकिक वाढवला. तिथे स्थायिक झाले. देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात बारामतीचे योगदान मोठे आहे. माझा जन्म झाला तेव्हा स्वातंत्र्यलढा सुरू होता, त्यामुळे स्वातंत्र्य लढ्यात माझे योगदान नाही, मात्र स्वातंत्र्यलढ्यात योगदान दिलेली खूप मोठी माणसे या ठिकाणी असल्याचे पवार म्हणाले.
 मोरोपंतांनी विपुल लेखन केलं, केकावली लिहिली. श्रीधर स्वामींनी इथल्याच कसब्यातल्या मंदिरात शिवलीलामृत ग्रंथ लिहिला, बारामतीचे योगदान खूप मोठं आहे. हे मोठं योगदान आपण नव्या पिढीला शिकवलं पाहिजे’, असे मत पवार यांनी व्यक्त केले.

....वय झालं म्हणून थकायचं नाही

बारामतीनगरी राज्यामध्ये आणि देशामध्ये आदर्श नगरी म्हणून मान्यता पावली आहे. तुम्हा लोकांच्या कष्टामुळे हा तालुका नावारूपाला आला आहे. मी आपणा सर्वांचा ऋणी आहे. वय वाढलं की त्याचा परिणाम गुडघ्यांवर होईल,पायांवर होईल पण डोक्यावर होणार नाही. त्यामुळे वय झालं म्हणून थकायचं नाही, वय झालं म्हणून विचार सोडायचा नाही. आपण चालत राहू एवढीच खूणगाठ बांधा ,असे आवाहन ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी केले.  

 

Web Title: '...because now my age has also turned 84", expressed Sharad Pawar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.