मेंदूत गाठ असल्याने ‘ति’ला ३५ वर्ष मासिक पाळीच नाही; खासगी रुग्णालयात यशस्वी उपचार
By ऑनलाइन लोकमत | Published: July 25, 2022 09:28 AM2022-07-25T09:28:36+5:302022-07-25T09:29:04+5:30
लघवीच्या त्रासावर उपचार करताना झाले निदान....
पुणे : मुलींना सर्वसाधारणपणे वयाच्या १४ वर्षांनंतर मासिक पाळी यायला सुरुवात होते. मात्र, पुण्याच्या ग्रामीण भागात राहणाऱ्या मंजूला (नाव बदलले आहे) वयाची ३५ वर्षे झाली तरी पाळी आली नाही. त्यातच गेल्या सहा महिन्यांपासून तिला अनियंत्रित आणि मोठ्या प्रमाणात लघवी व्हायला लागली. यानंतर कुटुंबीयांनी तिला नगर रस्त्यावरील खासगी रुग्णालयात दाखल केले असता मेंदूच्या सर्जननी तिचे अचूक निदान करीत मेंदूतील गाठ काढली. आता तिचा लघवीचा त्रास थांबला असून, तिला मासिक पाळीची प्रतीक्षा आहे. डॉक्टरांसाठी ही एक दुर्मीळ केस ठरली आहे.
मंजूच्या मेंदूत लहानपणापासून एक ट्यूमर (गाठ) होता. त्याचा आकार वाढत जाऊन तो १० सें.मी.चा झाला होता. पिट्युटरी ग्लँडला तो दाबून ठेवत असल्यामुळे तिला पाळी आली नाही आणि लघवीवरील नियंत्रण सुटत होते. मात्र, डोकेदुखी आणि डोळ्यांनी अंधुक दिसणे असा त्रास नव्हता; त्यामुळे तिची मेंदूची तपासणी झालीच नव्हती. परिणामी योग्य निदान झाले नाही.
दिवसाला व्हायची २४ ते २५ लिटर लघवी
पाळी येत नसल्याने घरच्यांनी तिच्या पोटाची सोनोग्राफी केली हाेती; पण त्यामध्ये निदान न झाल्याने शेवटी वयाच्या २४ व्या वर्षी तिचे आधीच मुले असलेल्या पुरुषासोबत लग्न लावून देण्यात आले हाेते. लग्नानंतर तिला काही वर्षे फार काही त्रास नव्हता. अलीकडे ४ ते ५ वर्षांत तिला प्रचंड तहान लागायला लागली. लघवीवरील नियंत्रणही सुटले. त्यामुळे बसल्या जागी लघवी व्हायची. दिवसाला तिला २४ ते २५ लिटर लघवी व्हायची.
वैद्यकीय भाषेत म्हणतात ‘क्रॅनिओफॅरिन्जिओमा’
मागील महिन्याभरापासून परिस्थिती खूपच कठीण होत चालली होती. नीट बोलताही येत नव्हते. त्यामुळे नातेवाइकांनी तिला नगर रोडवरील एका खासगी रुग्णालयात डॉ. प्रवीण सुरवसे या मेंदूच्या सर्जनना दाखविले. त्यांनी मेंदूचा एमआरआय काढायला सांगितला असता त्यात या गाठीचे निदान झाले. त्या गाठीला वैद्यकीय भाषेत ''क्रॅनिओफॅरिन्जिओमा'' असे म्हणतात. डॉक्टरांनी तातडीने यशस्वी शस्त्रक्रिया करून ती गाठ काढली.