एका दिवसात व्हा नॅचरोपथी डॉक्टर, पदवीचे आमिष दाखविणाऱ्या तीन डॉक्टरांवर गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2018 03:33 AM2018-04-20T03:33:46+5:302018-04-20T03:33:46+5:30
नेचरोपथीचा डॉक्टर बनविण्यासाठी एका दिवसात पदवी देण्याचे आमिष दाखवून १० हजार रुपयांची मागणी करीत फसवणुकीचा प्रयत्न केल्याचा प्रकार उघड झाला असून कोथरूड पोलिसांनी तिघा डॉक्टरांवर गुन्हा दाखल केला आहे़
पुणे : नेचरोपथीचा डॉक्टर बनविण्यासाठी एका दिवसात पदवी देण्याचे आमिष दाखवून १० हजार रुपयांची मागणी करीत फसवणुकीचा प्रयत्न केल्याचा प्रकार उघड झाला असून कोथरूड पोलिसांनी तिघा डॉक्टरांवर गुन्हा दाखल केला आहे़
निसर्गोपचार बहुउद्देशीय शिक्षण संस्थेचे डॉ़ मच्छिंद्र अगवण (रा़ कोथरूड), डॉ़ विश्वजित चव्हाण, डॉ़ रत्नपारखी (रा़ औरंगाबाद) अशी गुन्हा दाखल केलेल्यांची नावे आहेत़
याप्रकरणी अभिषेक हरिदास (वय ३६, रा़ कोथरूड) यांनी कोथरूड पोलिसांकडे फिर्याद दिली आहे़
याबाबत पोलिसांनी सांगितले की, हरिदास हे मानवी हक्क सरंक्षण व जागृती संस्थेच्या माध्यमातून जनजागृतीचे काम करतात़ त्यांनी आतापर्यंत बोगस पदव्या देणाºया १३ विद्यापीठांविरोधात तक्रार केली आहे़ याबाबत ते माहिती घेत असताना त्यांना नॅचरोपथीची बोगस पदवी घेऊन काही जण बोगस डॉक्टरी व्यवसाय करीत असल्याचे दिसून आले़
निसर्गोपचार बहुउद्देशीय शिक्षण संस्था, औरंगाबाद यांच्या वेबसाईटवरून डिप्लोमा इन नॅचरोपथी ही पदवी मिळत असल्याची माहिती त्यांना मिळाली़ औरंगाबादमधील कन्नड तालुक्यातील पळसखेडा येथे ही संस्था आहे़ या संस्थेच्या वेबसाईटवरील क्रमांकावर त्यांनी संपर्क केला़ त्यावेळी संस्थेचे संस्थापक-अध्यक्ष डॉ़ मच्छिंद्र अगवण यांच्याशी संपर्क साधला़ त्यांनी ही पदवी शासनमान्य असून तुमच्या नावापुढे डॉक्टर असे लावून तुम्ही वैद्यकीय व्यवसाय करू शकता, असे सांगितले़ त्यानंतर त्यांनी व्हॉट्सअॅपवर माहिती पुस्तक पाठवून दिले़ पदवी घेण्यासाठी दुसºया दिवशी बोलावले़ त्याप्रमाणे हरिदास व त्यांचे दोन मित्र हे औरंगाबाद जिल्ह्यातील पळसखेडा येथे गेले़ तेथे अगवण यांनी त्यांना सर्व माहिती दिली़
पदवी देण्याकरिता सरकारला १३ हजार ६०० रुपये फी भरावी लागते़ तुम्हाला एका दिवसात डिग्री देण्यासाठी आम्हाला दोन वर्षांचे हजेरी रेकॉर्ड तयार करावे लागते़ त्यासाठी ४ हजार रुपये खर्च येतो व आम्हाला २५ हजार रुपये जास्तीचे द्यावे लागतील, असे एकूण ४७ हजार ६०० रुपयांची मागणी रोख स्वरूपात केली़ हरिदास यांनी धनादेश देऊ केला तो त्यांनी घेतला नाही़ त्यांनी पुण्यातील डॉ़ विश्वजित चव्हाण, डॉ़ रत्नपारखी, डॉ़ प्रकाश प्रभू यांचे मोबाइल नंबर दिले़
व्हॉट्सअॅपवर प्रमाणपत्राचे नमुने पाठविले
पुण्यातील सेंटरशी संपर्क साधून तुम्ही ही पदवी घेऊ शकता, असे सांगितले़ त्याप्रमाणे ते पुण्यातील सेंटरवर मित्रांसह १५ एप्रिलला गेले़ तेथे डॉ़ चव्हाण यांच्याकडे औरंगाबाद येथे मिळणारी पदवी कशी मिळेल, याची चौकशी केली़ त्यांनी माहिती देऊन अगोदर दिलेल्या पदव्यांचे नमुने दाखविले़
पदवीकरीता रोख रक्कम लागेल, असे सांगून त्यांनी पदवी घेतल्यानंतर व्यवसायासाठी लागणारे लेटरपॅड, प्रीस्क्रिप्शन छापण्याचे नमुने देऊन दुसºया दिवशी बँक खात्यात १० हजार रुपये भरण्यासाठी बँक खाते क्रमांक दिला़ त्यानंतर एऩ डी पदवी आधी घेऊन त्यानंतर तुम्हाला बीए, एसएम, व बीएन, वायएस या पदव्या काही कालांतराने विश्वास बसल्यावर देण्याचे सांगून व्हॉट्सअॅपवर काही प्रमाणपत्रांचे नमुने पाठविले, असे फिर्यादीत म्हटले आहे़
त्यानुसार कोथरूड पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे़ पोलीस उपनिरीक्षक जाखडे अधिक तपास करीत आहेत़