‘जबाबदार पर्यटक’ होतोय बेभान!
By admin | Published: June 29, 2017 03:25 AM2017-06-29T03:25:17+5:302017-06-29T03:25:17+5:30
आपल्या अप्रतिम नैसर्गिक सौंदर्याने नटलेला माळशेजघाट सध्या बहरून गेला असून, माळशेज घाटाच्या या सौंदर्याची भुरळ मात्र पर्यटकांना होत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
खोडद : आपल्या अप्रतिम नैसर्गिक सौंदर्याने नटलेला माळशेजघाट सध्या बहरून गेला असून, माळशेज घाटाच्या या सौंदर्याची भुरळ मात्र पर्यटकांना होत आहे. वर्षासहलीसाठी अनेक पर्यटकांना निसर्गाने मुक्तहस्ते उधळण केलेल्या या माळशेजचे सध्या वेध लागले आहेत.
एक पर्यटक म्हणून निसर्गाचा आनंद उपभोगणे हा जरी आपला स्वयंघोषित मानवी हक्क असला, तरी माळशेज घाटात आलेल्या माणसामध्ये एक जबाबदार पर्यटक दिसून येत नाही किंवा माणसातला जबाबदार पर्यटक बेभान होताना दिसतोय. ही दुर्दैवाची बाब आहे. सह्याद्रीच्या पोटातून निघणाऱ्या वऱ्हाडी डोंगर रांगांच्या डोक्यावरून घाटमाथ्याहून खाली कोकणाकडे जाण्यासाठीचा एक रस्ता माळशेज घाटातून जातो. माळशेज घाट प्रशासकीयदृष्ट्या जरी ठाणे जिल्ह्यातील मुरबाड तालुक्यात येत असला, तरी त्याची जोड ही जुन्नरलाच लागून आहे. जुन्नरच्या पर्यटनाला येणारे पर्यटक हे माळशेज घाटात जातात किंवा माळशेज घाटात येणारे पर्यटक हे जुन्नरला येत आहेत.
माळशेज घाटातील सुंदर निसर्ग, दुर्मिळ फुलझाडे, परदेशी पक्ष्यांचे आश्रयस्थान, आपल्या दिमाखात मिरवणारा माळशेज घाट पर्यटकांचे आकर्षण केंद्र झाल्याशिवाय राहत नाही. मुंबईकडून माळशेजकडे येताना दिसणारा नाणेघाट, त्याच्या बाजूचे भोरांड्याचे दार, मोरोशी जवळचा डोंगराच्या पोटातील अजस्र कातळ भिंतीचा भैरवगड, माळशेज घाट चढून येत असताना जराशी धोकादायक पण साहसी वाटणारी धबधब्यांची माळ, बोगदा, घाटात विकसित झालेली निसर्ग पर्यटनाची स्थळे, घाटमाथ्यावरील एमटीडीसीचे पर्यटकांसाठीचे निवास स्थान, पुढे पिंपळगाव जोगा धरणाची पश्चिमेकडील भिंत आणि त्यावरून उत्तरेकडे जाताना डावीकडे काळू नदीच्या पलीकडे असणारे मध्ययुगीन खिरेश्वराचे मंदिर, शिंदोळा किल्ला, गणेश खिंड अशी लांबत जाणारी पर्यटनस्थळांची शृंखला पर्यटनाचा आवाका सांगून जाते.