नदीकाठचा मधमाश्यांचा अधिवास जपावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2021 04:11 AM2021-05-20T04:11:42+5:302021-05-20T04:11:42+5:30
पुणे : मधमाश्यांसाठी नदीकाठ हा अतिशय महत्त्वाचा अधिवास आहे. कारण या ठिकाणी त्यांना मुबलक खाद्य मिळत असते. त्यामुळे मुठाकाठी ...
पुणे : मधमाश्यांसाठी नदीकाठ हा अतिशय महत्त्वाचा अधिवास आहे. कारण या ठिकाणी त्यांना मुबलक खाद्य मिळत असते. त्यामुळे मुठाकाठी असलेल्या झाडांचे संवर्धन करून, तिथे कोणत्याही प्रकारचे सिमेंटीकरण करणे म्हणजे मधमाश्यांच्या अधिवासावर घाला घालण्यासारखे आहे, असे मत ग्रीन बर्ड्स अभियानाच्या संस्थापक प्रिया फुलंब्रीकर यांनी व्यक्त केले.
फुलंब्रीकर म्हणाल्या,‘‘ यंदा २० मे रोजी जागतिक मधमाशी दिन साजरा होत आहे. त्यानिमित्त शहरात मधमाशा संवर्धन करण्याचा उपक्रम सुरू केला आहे. त्यामध्ये शहरात इमारतींवर असलेले पोळं नष्ट न करता ते जपावे आणि मधमाश्यांना मारू नये, यासाठी या उपक्रमातून प्रयत्न केला जात आहे. यामध्ये तरुणांना पोळं कसे काढावे, त्यातून मध कसा घ्यावा याचे प्रशिक्षण देऊन त्यातून रोजगार निर्माण केला जात आहे.’’
नदीलगतच्या काठांवर पाणथळ जागा असतात त्यामध्ये देखील विशिष्ट प्राणी-पक्षी-वनस्पती अशी जीवसृष्टी नांदत असते. तसेच हिवाळ्यात स्थलांतर करून आलेले पाणपक्षी पण या पाणथळ जागा वापरतात. नदी किनाऱ्यावरील जांभूळ, आंबा, कडुनिंब अशा उंच व स्थानिक वृक्षांवर मधमाश्या पोळी बांधतात. तसेच त्या मधमाश्या नदी किनाऱ्यावरील व आसपासच्या सपुष्प वनस्पतींवर जाऊन फुलांतील पुष्परस व पराग गोळा करतात. कीटकांमध्ये एकूण ७०-८०% परागीभवन मधमाश्यांमार्फत होत असते. त्यामुळे निसर्गात जैवविविधता वृद्धिंगत होते. म्हणजेच नदीकाठ हा मधमाश्यांचा एक महत्वाचा अधिवास आहे. मधमाश्यांचा नैसर्गिक अधिवास नष्ट झाला की त्या शहरांतील मानवी हद्दीत इमारतींसारख्या ठिकाणी पोळी बांधतात. त्यामुळे त्यांचा मूळ अधिवास जपणे हे महत्त्वाचे आहे.