पोलिसांचा पुन्हा 'वाल्मीक पॅटर्न'?; फरार PSI कासले काल स्वत:हून पुण्यात आला, अन् आज अटक झाली!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2025 11:08 IST2025-04-18T11:08:26+5:302025-04-18T11:08:49+5:30

फरार असलेला रणजीत कासले स्वत: दिल्लीहून पुण्यात आल्यानंतर आणि त्याने माध्यमांशी संवाद साधल्याच्या काही तासांनंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं आहे.

beed Police walmik karad pattern again Absconding PSI ranjeet Kasle came to Pune yesterday and was arrested today | पोलिसांचा पुन्हा 'वाल्मीक पॅटर्न'?; फरार PSI कासले काल स्वत:हून पुण्यात आला, अन् आज अटक झाली!

पोलिसांचा पुन्हा 'वाल्मीक पॅटर्न'?; फरार PSI कासले काल स्वत:हून पुण्यात आला, अन् आज अटक झाली!

Beed Police: बीडमधील सायबर पोलीस ठाण्यातील निलंबित पीएसआय रणजीत कासले याला अखेर बीड पोलिसांनी पुण्यातून अटक केली आहे. पोलिसांना खुलं आव्हान देऊन फरार झालेला रणजीत कासले काल विमानाने दिल्लीवरून पुण्यात आला होता. त्यानंतर त्याने पुणे विमानतळावर पत्रकार परिषदही घेतली. मात्र तरीही काल त्याला ताब्यात घेण्यात आलं नव्हतं. मी स्वत:हून पुणे पोलिसांसमोर सरेंडर होणार आहे, असं त्याने सांगितलं. परंतु त्याने सरेंडर होण्याआधी बीड पोलिसांनी अखेर त्याला आज पहाटेच्या सुमारास स्वारगेट परिसरातील एका हॉटेलमधून ताब्यात घेतलं.

बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या आणि पवनचक्की कंपनीला खंडणी मागितल्याच्या गुन्ह्यात फरार असलेल्या वाल्मीक कराड यानेही पोलिसांना अनेक दिवस चकवा दिला होता. त्यानंतर तो स्वत:हूनच सीआयडीच्या पुणे कार्यालयात हजर झाला आणि त्यानंतर पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या. निलंबित पीएसआय रणजीत कासले याच्याबाबतही असाच काहीसा प्रकार घडला आहे. कासले फरार असताना त्याला पकडण्यात पोलिसांना यश आलं नव्हतं. मात्र तो स्वत: दिल्लीहून पुण्यात आल्यानंतर आणि त्याने माध्यमांशी संवाद साधल्याच्या काही तासांनंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं आहे.

दरम्यान, अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल असलेल्या रणजीत कासले याने राजकीय नेत्यांसह पोलीस दलावरही अनेक गंभीर आरोप केले आहेत. याबाबतचे पुरावेही माझ्याकडे असल्याचा दावा त्याने केला आहे.

रणजीत कासले आणि वादांची मालिका

निलंबित पोलीस उपनिरीक्षक रणजित कासले याच्यावर ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झाला होता. त्यानंतर त्याने हिंमत असेल तर पकडून दाखवा, असे म्हणत महाराष्ट्र पोलिसांना आव्हान दिले होते. मात्र बुधवारी त्याने पोलीस माझेच आहेत, असे म्हणत आपण पुण्यात गुरुवारी सकाळी बीड पोलिसांना शरण येणार असल्याचा दावा व्हिडीओद्वारे केला.

रणजीत कासले हा सायबर पोलीस ठाण्यात असताना विनापरवानगी आरोपीला घेऊन गुजरातमध्ये गेला होता. तेथे त्याने पैसे घेतल्याचा आरोप त्याच्यावर झाला. याची चौकशी करून पोलिस अधीक्षक नवनीत काँवत यांनी कासलेला २६ मार्च रोजी निलंबित केले होते. त्यानंतर कासलेने एकापाठोपाठ एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल करत आपले वरिष्ठ अधिकारी आणि राजकीय नेत्यांवर आरोप केले होते. वाल्मीक कराड याच्या एन्काउंटरसाठीही आपल्याला विचारणा झाल्याचा सणसणाटी दावाही त्याने केला होता. असेच व्हिडीओ व्हायरल करत असताना त्याने एका समाजाबाबत आक्षेपार्ह विधान केले. या प्रकरणी बीडमधील वकिलाच्या फिर्यादीवरून १४ एप्रिल रोजी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता.
 

Web Title: beed Police walmik karad pattern again Absconding PSI ranjeet Kasle came to Pune yesterday and was arrested today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.