Bee Attack: देवीच्या दर्शनासाठी गेलेल्या कुटुंबावर मधमाशांचा हल्ला; १० जण जखमी, सिंहगड परिसरातील घटना
By श्रीकिशन काळे | Updated: April 28, 2023 17:28 IST2023-04-28T17:18:40+5:302023-04-28T17:28:42+5:30
मधमाशांनी केलेला हल्ला तीव्र असल्याने सर्वजण जखमी अवस्थेत पळत सुटले

Bee Attack: देवीच्या दर्शनासाठी गेलेल्या कुटुंबावर मधमाशांचा हल्ला; १० जण जखमी, सिंहगड परिसरातील घटना
पुणे : किल्ले सिंहगड परिसरात देवीच्या दर्शनासाठी जाणाऱ्या एका कुटुंबातील दहा जणांवर मधमाशांची हल्ला केला. त्यामुळे त्यांना रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हा प्रकार गुरूवारी घडला.
सिंहगड किल्ल्याच्या पश्चिम बाजूला असलेल्या खामगाव मावळ येथे हा प्रकार घडल्याचे समोर आले आहे. एकाच कुटुंबातील दहा जण मधमाशांच्या हल्ल्यात गंभीर जखमी झाले असल्याने त्यांना खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. एकमेकांचे नातेवाईक असलेले दहाजण सांबरेवाडी येथील भवानी आई मातेच्या दर्शनासाठी निघाले होते. तेव्हा अचानक त्यांच्यावर मधमाशांनी हल्ला केला. मधमाशांनी केलेला हल्ला तीव्र असल्याने सर्वजण जखमी अवस्थेत पळत सुटले. या घटनेची माहिती काही जणांना मिळाल्यानंतर जवळच्या गावातील लोकांना त्यांना शोधून रूग्णालयात दाखल केले. किरकेटवाडी येथील एका खाजगी रुग्णालयात उपचार होत आहेत.
पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी या घटनेची दखल घेऊन पोलीस प्रशासनाला तातडीने माहिती घेण्यासाठी सांगितले. तसेच जखमींना मदत करण्याच्या सूचना दिल्या. दरम्यान, मधमाशांनी हल्ला का केला ? याविषयी तर्कवितर्क लावले जात आहेत. कारण मधमाशा कधीच विनाकारण हल्ला करत नाहीत. या आग्या मोहोळाच्या मधमाशा असाव्यात, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. कारण त्याच मधमाशांमुळे माणसं मोठ्या प्रमाणावर जखमी होतात आणि रूग्णालयात दाखल व्हावे लागते.