किल्ले राजगडावरील पर्यटकांवर मधमाशांचा हल्ला; २ महिलांसह चौघांची प्रकृती गंभीर, इतर किरकोळ जखमी
By ऑनलाइन लोकमत | Published: October 8, 2023 04:30 PM2023-10-08T16:30:51+5:302023-10-08T16:36:07+5:30
अंगावर मारलेल्या सुगंधी द्रव्यांमुळे (परफ्यूम, सेंट) मधमाशांनी हल्ला केल्याचा स्थानिकांचा अंदाज
वेल्हे : वेल्हे तालुक्यातील किल्ले राजगडावर पर्यटनासाठी आलेल्या पर्यटकांवर मधमाशांनी हल्ला केला आहे या पर्यटकांमधील दोन महिला व दोन पुरुष बेशुद्ध अवस्थेत असून इतर बारा ते तेरा पर्यटक किरकोळ जखमी झाल्याची माहिती पुरातत्त्व विभागाची कर्मचारी बापू साबळे यांनी दिली आहे. यामध्ये अद्यापही जखमी पर्यटकांची नावे कळू शकली नाहीत. ही घटना आज सकाळी साडेआठ ते नऊच्या सुमारास घडली असून पर्यटकांनी स्वतःच्या अंगावर मारलेल्या सुगंधी द्रव्यांमुळे येथील मधमाशांनी हल्ला केल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे.
स्थानिकांकडून मिळाल्या प्राथमिक माहितीनुसार पर्यटकांमध्ये डोंबिवली, मुंबई तसेच पुणे येथील सोळा जणांचा ग्रुप किल्ले राजगड पर्यटनासाठी आला असता हा ग्रुप किल्ले फिरत असताना सुवेळा माची जवळ आला.याठिकाणी अनेक मधमाशांचे पोळे आहेत त्या ठिकाणी आलेल्या पर्यटकांनी अंगावर मारलेल्या सुगंधी द्रव्यामुळे (सेंट परफ्युम) मुळे तेथील बारा ते तेरा पर्यटकांवर मधमाशांनी हल्ला केला यामध्ये दोन महिला व दोन पुरुषांना अधिक मधमाशा चावल्यामुळे हे चार पर्यटक बेशुद्ध अवस्थेत असल्याची माहिती मिळाली असून इतर पर्यटक किरकोळ जखमी झाले आहे .
घटनेचे गांभीर्य ओळखून भोरचे उपविभागीय अधिकारी राजेंद्र कचरे व तहसीलदार दिनेश पारगे यांनी पोलीस प्रशासन व आरोग्य विभागाशी संपर्क साधला. दरम्यान वेल्ह्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रणजीत पठारे यांच्या आदेशानुसार पोलीस कॉन्स्टेबल आकाश पाटील व होमगार्ड विजय गोहिणे घटनास्थळी दाखल झाले असून किल्ल्यावर कार्यरत असलेले पुरातत्व विभागाचे कर्मचारी बापू साबळे, आकाश कचरे यांच्यासह स्थानिक नागरिकांनी गडावर धाव घेतली असून या चार पर्यटकांना गडावरून स्ट्रेचरच्या च्या सहाय्याने खाली आणण्यात सुरुवात केली. असून गडाच्या पायथ्याशी असलेल्या खंडोबा माळ येथे प्रांताधिकारी राजेंद्र कचरे व तहसीलदार दिनेश पारगे यांच्या सूचनेनुसार किल्ले राजगडाच्या पायथ्याशी खंडोबा माळ येथे ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी व ॲम्बुलन्स दाखल झाले असून गडावरून आल्यानंतर त्यांच्यावर उपचार सुरू केले जाणार आहेत.