लेणी पाहण्यासाठी आलेल्या विद्यार्थ्यांवर मधमाशांचा हल्ला; ३० जखमी, एका मुलीची प्रकृती गंभीर
By ऑनलाइन लोकमत | Published: February 28, 2022 02:39 PM2022-02-28T14:39:05+5:302022-02-28T14:40:07+5:30
जुन्नर जवळील मानमोडी डोंगरावरील लेणी पाहण्यासाठी आलेल्या कडूस येथील शालेय विद्यार्थ्यांवर मधमाशांनी हल्ला केला
जुन्नर : जुन्नर जवळील मानमोडी डोंगरावरील लेणी पाहण्यासाठी आलेल्या कडूस येथील शालेय विद्यार्थ्यांवर मधमाशांनी हल्ला केला. या घटनेत ३० विद्यार्थी जखमी झाले. एका विद्यार्थिनीची प्रकृती गंभीर आहे. १० विद्यार्थी व १ शिक्षिकेस नारायणगाव येथे खासगी रुग्णालयात उपचारासाठी पाठविण्यात आले आहे. इतर विद्यार्थ्यांपैकी २० विद्यार्थ्यांवर औषधोपचार करण्यात आले असून त्यांची प्रकृती स्थिर आहे.
खेड येथील डायनॅमिक इंग्लिश मीडियम स्कूलचे ६९ विद्यार्थी आणि विद्यार्थिनी पर्यटनासाठी जुन्नर तालुक्यात आले होते. हडसर किल्ला पाहून झाल्यानंतर ते मानमोडी डोंगरावरील लेणी पाहण्यासाठी गेले होते. लेणीमध्ये जाताच येथील आग्या मोहळातील मधमाशांनी या विद्यार्थ्यांवर हल्ला केला. मधमाशांच्या हल्ल्यामुळे मुलांची पळापळ झाली. मधमाशा ३० मुलामुलींना चावल्या. यात एका मुलीची प्रकृती चिंताजनक आहे.
ही घटना समजताच वनरक्षक रमेश खरमाळे, माजी नगरसेवक संजय साखला, उद्योजक संजय वारुळे, मयूर महाबरे, राजकुमार चव्हाण, विनायक मांडे, फिरोज पठाण, प्रशांत कबाडी हे तातडीने घटनास्थळी दाखल झाले. जखमींना तातडीने जुन्नरच्या ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. आमदार अतुल बेनके यांनीही तातडीने ग्रामीण रुग्णालय जुन्नर येथे धाव घेऊन संबंधित विद्यार्थ्यांवर योग्य उपचार करण्याबाबत सूचना केल्या.