वडिलांना वाढदिवसाचे सरप्राईज द्यायचे राहिले, त्याआधीच देवाने अश्विनीला हिरावले! अश्विनीच्या आईचा आक्रोश

By नम्रता फडणीस | Published: May 20, 2024 06:44 PM2024-05-20T18:44:22+5:302024-05-20T18:49:16+5:30

कल्याणीनगर येथील अपघातात बळी गेलेल्या अश्विनी कोस्टाच्या आईने हंबरडा फाेडला. त्यांचा आक्रोश पाहून उपस्थितांचे काळीज हेलावून गेले....

Before Dad wanted to give a birthday surprise, God took away Ashwini! Ashwini's mother cries | वडिलांना वाढदिवसाचे सरप्राईज द्यायचे राहिले, त्याआधीच देवाने अश्विनीला हिरावले! अश्विनीच्या आईचा आक्रोश

वडिलांना वाढदिवसाचे सरप्राईज द्यायचे राहिले, त्याआधीच देवाने अश्विनीला हिरावले! अश्विनीच्या आईचा आक्रोश

पुणे : अश्विनी शनिवारी (दि. १८) रात्री माझ्याशी बोलली होती. तिने १८ जूनला जबलपूरला येण्याचे तिकीट काढले होते. वडिलांचा वाढदिवस असल्याने तिला त्यांना सरप्राईज द्यायचे होते. ते आता सरप्राईजच राहिले... देवाने तिला आमच्यापासून हिरावून नेले... असे सांगत कल्याणीनगर येथील अपघातात बळी गेलेल्या अश्विनी कोस्टाच्या आईने हंबरडा फाेडला. त्यांचा आक्रोश पाहून उपस्थितांचे काळीज हेलावून गेले.

कुणाच्या तरी चुकीची शिक्षा माझ्या निष्पाप मुलीला का ? असा सवालही अश्विनीच्या आईने केला. अश्विनीचे पार्थिव ससून रुग्णालयाच्या शवागारात रुग्णवाहिकेतून आणल्यावर ते पाहताच आईने आक्राेश केला.

कल्याणीनगर भागात रविवारी पहाटे भीषण अपघात झाला. त्यात कारच्या धडकेत अनिश अवधिया आणि अश्विनी कोस्टा या संगणक अभियंत्यांचा मृत्यू झाला. या घटनेने अवघे पुणे शहर हादरून गेले. अश्विनी ही मूळची मध्य प्रदेशातील जबलपूर येथील. पुण्यातील वाडिया महाविद्यालयातून तिने कॉम्प्युटर सायन्समध्ये पदवी घेतली होती.

अनिश अवधियाने डी.वाय. पाटील कॉलेजमधून कॉम्प्युटर सायन्समध्ये इंजिनिअरिंगची पदवी घेतली होती. दोघेही जॉन्सन कंट्रोल या कंपनीत काम करीत होते. त्यातून त्यांची मैत्री झाली होती. अपघातानंतर दोघांना येरवडा येथील खासगी रुग्णालयात दाखल केले होते. मात्र, डॉक्टरांनी उपचारांपूर्वीच त्यांना मृत म्हणून घोषित केले. त्यांचे मृतदेह रविवारी दुपारी चार वाजता विच्छेदनासाठी ससून रुग्णालयात आणले.

या अपघाताची माहिती समजल्यावर अश्विनीचे आई-वडील आणि लहान भाऊ मोटारीने जबलपूरहून नागपूरला आणि तेथून विमानाने पुण्याला आले. मुलीचे शेवटचे दर्शन घेताना अश्विनीची आई धाय मोकलून रडायला लागली. अश्विनीला हलवून उठविण्याचा त्या सातत्याने प्रयत्न करीत होत्या. त्यामुळे उपस्थित हेलावून गेले होते.

अश्विनीचा भाऊ संप्रित म्हणाला की, "आम्हाला खूप मोठा धक्का बसला आहे. कालचे आमचे झालेले बोलणे शेवटचे ठरले. अनिस अवधियाचा चुलत भाऊ पारस सोनी म्हणाला की, आम्हाला पहाटेच फोन आला आणि धक्काच बसला. अनिशचे आई-वडील वृद्ध आहेत. त्यांची काळजी घेणारे कोणी नाही. त्यामुळे त्यांना अगोदर या घटनेची माहिती दिली नव्हती. अनिशच्या वडिलांचा प्रिंटिंग प्रेसचा व्यवसाय आहे. आमच्या कुटुंबातील अनिस हा पहिला आयटी इंजिनिअर होता.

Web Title: Before Dad wanted to give a birthday surprise, God took away Ashwini! Ashwini's mother cries

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.