फेसबुकवर मैत्री केली, महिला डॉलरच्या आमिषाने गंडली! पुण्यातील घटना
By भाग्यश्री गिलडा | Published: March 30, 2024 04:23 PM2024-03-30T16:23:41+5:302024-03-30T16:24:19+5:30
या प्रकरणी शुक्रवारी (दि. २९) वानवडी पोलिस ठाण्यात टोनी मिचेल नावाच्या अनोळखी व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे...
पुणे : फेसबुकवर ओळख करून डॉलर देण्याच्या बहाण्याने महिलेची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी शुक्रवारी (दि. २९) वानवडी पोलिस ठाण्यात टोनी मिचेल नावाच्या अनोळखी व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत वानवडी परिसरात राहणाऱ्या एका ४९ वर्षीय महिलेने पोलिसांना फिर्याद दिली आहे. २ मार्च ते २९ मार्चच्या दरम्यान हा प्रकार घडला आहे. फिर्यादी महिला आणि टोनी यांच्यात फेसबुकवरून ओळख झाल्यानंतर काही दिवसांनी व्हॉट्सॲप कॉलवरून बोलणे वाढले. त्यानंतर लंडनहून तुझ्यासाठी डॉलर आणले असल्याचे मिचेलने सांगितले. प्रत्येक वेळी तुमचे गिफ्ट विमानतळावर पाठविले आहे, पण कस्टम ड्युटीमुळे ते भारतात आणण्यास अडचणी येत असल्याचे सांगून समोरील व्यक्तीने त्या महिलेकडून पैसे मागण्यास सुरुवात केली.
त्याच्यावर विश्वास ठेवून टप्प्याटप्प्याने महिलेने ७५ हजार रुपये पाठविले. काही कालावधीनंतर पैसे संपले असल्याचे सांगितल्यावर मिचेलने त्यांना फोन करायचे बंद केले. ना यूएस डॉलर ना स्वत:ची रक्कम परत मिळाली. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर महिलेने वानवडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पुढील तपास वरिष्ठ पोलिस निरीक्षक संजय पतंगे करत आहेत.