व्यवस्थापन परिषदेच्या निवडणुकीत सुरुवातीलाच गोंधळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2018 01:12 PM2018-03-17T13:12:04+5:302018-03-17T13:12:04+5:30
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेच्या सदस्य पदासाठी आज निवडणूक होत आहे. शिक्षक, व्यवस्थापन प्रतिनिधी आणि प्राचार्य गटातील प्रत्येकी एका जागेसाठी आज मतदान होऊन त्याचा निकालही जाहीर केला जाणार आहे.
पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने अधिसभा सभागृहाच्या बाहेर मतदानाची व्यवस्था केल्याने उच्च शिक्षण विभागाचे संचालक धनराज माने यांनी यावर तीव्र आक्षेप घेतला. नियमानुसार तातडीने सभागृहातच मतदानाची व्यवस्था करण्याचे निर्देश त्यांनी दिले. त्यामुळे मतदानाच्या सुरुवातीलाच गोंधळ उडाला.
दुपारी साडे बाराची मतदानाची वेळ आहे. मात्र या गोंधळात वेळ उलटून गेला तरी मतदान सुरु झालेले नाही.सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेच्या सदस्य पदासाठी आज निवडणूक होत आहे. शिक्षक, व्यवस्थापन प्रतिनिधी आणि प्राचार्य गटातील प्रत्येकी एका जागेसाठी आज मतदान होऊन त्याचा निकालही जाहीर केला जाणार आहे. याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. व्यवस्थापन प्रतिनिधीतून डॉ. डी. वाय. पाटील विद्या प्रतिष्ठान सोसायटीचे सोमनाथ पाटील आणि प्रोगेसिव्ह एज्युकेशन सोसायटीचे प्रा. शामकांत देशमुख हे एकाच पॅनेलमधून अधिसभेवर निवडून आलेले आहेत. मात्र, या दोघांमध्ये आता व्यवस्थापन परिषदेच्या सदस्यांसाठी निवडणूक होत आहे. या दोघांमध्ये निवडणूक चुरस होणार असल्याचे चित्र आहे. प्राचार्य गटातून पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या रामकृष्ण मोरे महाविद्यालयाचे प्राचार्य मनोहर चासकर आणि नाशिकच्या केटीएचएम महाविद्यालयाचे प्राचार्य व्ही. बी. गायकवाड यांच्यात निवडणूक होत आहे. गायकवाड हे विद्यापीठाचे "बीसीयुडी'चे संचालक म्हणून काम पाहिले आहेत. त्यामुळे यात कोण विजयी होणार, त्याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. तसेच शिक्षक गटातून महेश आबाळे आणि कन्हू गिरमकर यांच्यात लढत होणार आहे. हे सर्व निकाल दुपारपर्यंत स्पष्ट होतील.