नवदांपत्याच्या सहजीवनाची सुरुवात श्रमदानातून : पानी फाउंडेशन उपक्रमात सहभाग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2018 21:14 IST2018-04-20T21:14:22+5:302018-04-20T21:14:22+5:30
सेजल आणि रणजित यांचा शुक्रवारी (दि. २०) विवाह होता.विवाहाच्या आदल्या दिवशी नवरदेवाच्या नातेवाईकांनी पाणी फाउंडेशनच्या समन्वयकांशी संपर्क साधुन विवाहापुर्वी श्रमदान करण्याची इच्छा व्यक्त केली.

नवदांपत्याच्या सहजीवनाची सुरुवात श्रमदानातून : पानी फाउंडेशन उपक्रमात सहभाग
बारामती : विवाह प्रत्येकाच्या आयुष्यातील महत्वाचा टप्पा मानला जातो. हा टप्पा पार पडला कि यशस्वी आयुष्याची सुरवात झाली, असा देखील समज आहे.या टप्प्यानंतरच नवीन जीवनाची सुरवात होते.मात्र, आज बारामती तालुक्यातील एका नवदांपत्याने केलेली नविन जीवनाची सुरवात कौतुकाचा विषय ठरली आहे.विवाहापुर्वी या दांपत्याने पानी फाउंडेशन उपक्रमाअंतर्गत सोनवडी सुपे येथे सुरु असलेल्या श्रमदानात सहभाग घेतला.या दाम्पत्याची सुरवात इतरांसाठी पथदर्शी ठरावी अशीच आहे.
उंडवडी (ता. बारामती) येथील पांडुरंग किसन पवार यांची कन्या सेजल आणि पुणे हडपसर येथील शिवाजी किसन घोडके यांचे चिरंजीव रणजित यांचा शुक्रवारी (दि. २०) विवाह होता. विवाहाच्या आदल्या दिवशी नवरदेवाच्या नातेवाईकांनी पाणी फाउंडेशनच्या समन्यकांशी संपर्क साधुन विवाहापुर्वी श्रमदान करण्याची इच्छा व्यक्त केली. त्यानुसार आज शिवाजी आणि सेजल या दोघांनी सोनवडी सुपे येथील महाश्रमदानामध्ये सहभाग घेतला.सुमारे अर्धा तास या नवदांपत्याने काम केले.श्रमदानाने नविन जीवनाची सुरवात करणारे हे दांपत्य आज इतरांसाठी प्रेरणादायी ठरले.सुमारे ९ घनमीटर लांबीची सलग समतल चर खोदून पूर्ण झाली आहे.त्यामध्ये जवळपास १ हजार लीटर पाणी साठणार आहे.त्यांच्या थेट सहभागामुळे इतरांचा उत्साह देखील दुणावला होता.या दोघांबरोबर ५० ते ५५ ग्रामस्थांनी श्रमदान केले.
उंडवडी कप गावाने पानी फाउंडेशनच्या सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेत भाग घेतला आहे. मात्र, केवळ श्रमदान करण्यासाठी नवदांपत्याने सोनवडी सुपे गाठले.आज सकाळी १०.३० वाजता हे दांपत्य श्रमदानासाठी या ठीकाणी पोहचले. त्यांनी तीव्र उन्हाची पर्वा न बाळगता मोठ्या उत्साहाने स्वयंस्फुर्तीने श्रमदान केले. हे श्रमदान आज संपुर्ण तालुक्यात कौतुकाचा विषय ठरले.या नवदांपत्याचे गावच्या सरपंच मंदा मोरे व उपसरपंच भाऊसाहेब मोरे यांच्यासह पानी फाउंडेशनचे तालुका समन्वयक पृथ्वीराज लाड व मयूर साळुंके यांनी कौतुक केले. श्रमदानानंतर येथील मोठ्या उत्साहात नवरदेव रणजीत व नवरी सेजल यांचा शुभविवाह पार पडला.
————
...त्याचे आम्हा दोघांना
मनस्वी समाधान
विवाह हा प्रत्येकाच्या जीवनातील महत्वाचा आंनदाचा दिवस असतो.कोणी हेलीकॉप्टरमध्ये,कोणी समुद्राच्या पाण्याखाली, आकाशात ,निर्जन बेटावर विवाहबध्द होतात. माझी देखील माझ्या वैवाहिक आयुष्याची सुरवात चांगल्या कामाने व्हावी, अशी मनापासुनची इच्छा होती. दिवसेंदिवस जलसंधारणाच्या कामांचे महत्व वाढत आहे.पानी फाउंडेशनने त्यासाठी घेतलेला पुढाकार माझ्यासाठी प्रेरणादायी आहे.आज माझ्या वैवाहिक जीवनाची सुरवात याच जलसंधारणाच्या कामाने झाली.त्याचे आम्हा दोघांना मनस्वी समाधान आहे, असे नवरदेव शिवाजी घोडके यांनी यावेळी सांगितले.
————
...श्रमदानाचे महत्व आणखी अधोरेखित
सध्या बारामती तालुक्यातील ३३ गावांमध्ये श्रमदानाची कामे सुरु आहेत.शेकडो ग्रामस्थ यामध्ये काम करीत आहेत.या कामांतुन गावाचा कायापालट करण्याच्या ध्यासाने सर्वांनाच झपाटुन टाकले आहे.त्यामुळे सर्वचजण ही कामे पुर्ण करण्यासाठी प्रयत्नशील आहेत.आज येथे नवदांपत्याने केलेल्या श्रमदानामुळे श्रमदानाचे महत्व आणखी अधोरेखित झाले.नवदांपत्य उच्चशिक्षित आहे.शहरात राहुन देखील त्यांनी जलसंधारणाच्या कामाचे महत्व जाणले.त्यामुळेच या कामामध्ये सहभाग घेण्याची इच्छा व्यक्त करुन ते थांबले नाहित.तर कामात प्रत्यक्ष सहभा ग देखील घेतला,असे तालुका समन्वयक मयूर साळुंके यांनी ‘लोकमत’ शी बोलताना सांगितले.
————
....गावांची दुष्काळी ओळख
कायमची पुसण्यास मदत होणार
बारामती तालुक्यातील वढाणे, सुपा ,काळखैरेवाडी,बºहाणपुर, नेपतवळण, भिलारवाडी ,पळशीवाडी ,मासाळवाडी, दंडवाडी ,आंबी बुद्रुक ,काऱ्हाटी ,खराडेवाडी, निंबोडी, उंडवडी सुपे , कारखेल, सोनवडी सुपे,कटफळ ,मुर्टी,कऱ्हावागज,वाकी,सोरटेवाडी,कन्हेरी,सावंतवाडी,गोजुबावी,पानसरेवाडी,लोणी भापकर, जळगाव सुपे, पारवडी,अंजनगाव, गाडीखेल, कांबळेश्वर शिरवली,सदोबाचीवाडी या गावांनी पानी फाउंडेशनच्या सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेत भाग घेतला आहे. गावोगावी शेततळी,बांधबंदीस्ती,समतल चराची मोठ्या प्रमाणात कामे सुरु आहेत.ही कामे पुर्ण झाल्यानंतर या गावांमध्ये कोट्यावधी लीटर पाणी साठणार आहे.परिणामी या गावांची दुष्काळी ओळख कायमची पुसण्यास मदत होणार आहे, असे पानी फाउंडेशनचे तालुका समन्वयक मयूर साळुंके यांनी ‘लोकमत’ शी बोलताना सांगितले.
————