"याचि देही याचि डोळा..." सूर, लय, तालाच्या संगमातून ६८ व्या 'सवाई'च्या स्वरयज्ञास प्रारंभ

By ऑनलाइन लोकमत | Published: December 15, 2022 01:15 PM2022-12-15T13:15:39+5:302022-12-15T13:15:52+5:30

दोन वर्षाच्या खंडानंतर सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवाला उत्साहात सुरुवात

Beginning of the 68th Sawai Swarayjna from the confluence of melody rhythm and rhythm | "याचि देही याचि डोळा..." सूर, लय, तालाच्या संगमातून ६८ व्या 'सवाई'च्या स्वरयज्ञास प्रारंभ

"याचि देही याचि डोळा..." सूर, लय, तालाच्या संगमातून ६८ व्या 'सवाई'च्या स्वरयज्ञास प्रारंभ

googlenewsNext

पुणे : सूर, लय, ताल यांच्या अद्वितीय संगमातून साकार झालेल्या ६८ व्या सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवाच्या 'स्वरयज्ञा'ला बुधवारी रसिकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादात प्रारंभ झाला. उस्ताद अमजद अलीखाँ यांनी सरोदच्या मंजूळ तारा छेडत अभूतपूर्व कलाविष्काराची दिलेली सुंदर अनुभूती... संगीतमार्तंड पंडित जसराज यांच्या घराण्याचा वारसा पुढे नेणाऱ्या पं. रतन मोहन शर्मा यांच्या अभिजात गायकीचे घडलेले दर्शन आणि शाश्वती मंडल यांच्या सुमधुर गायकीने खिळवून ठेवलेली मैफल रसिकांसाठी संस्मरणीय ठरली.

दोन वर्षांच्या विरामानंतर आर्य संगीत प्रसारक मंडळाच्या वतीने रंगलेल्या 'स्वरयज्ञात' अभिजात संगीत क्षेत्रातील दिग्गज कलाकारांना 'याचि देही याचि डोळा' अनुभवण्याची संधी मिळाल्याने रसिकांमध्येही आनंदाची लहर पसरली होती.

महोत्सवाच्या पहिल्या दिवसाची सुरुवात स्वरभास्कर पं. भीमसेन जोशी यांचे शिष्य पं. उपेंद्र भट यांच्या बहारदार गायनाने झाली. पं. भट यांना मंडळाचे कार्याध्यक्ष श्रीनिवास जोशी यांच्या हस्ते ‘वत्सलाबाई जोशी पुरस्कार' प्रदान करण्यात आला. सवाई गंधर्व यांचे नातेवाईक एस. जी. जोशी हे खास हुबळीहून प्रवास करून आले होते. त्यांनी पंडित भीमसेन जोशी यांचे गुरू सवाई गंधर्व यांच्यावरील विशेष टपाल तिकीट श्रीनिवास जोशी यांना सुपुर्द केले. हे तिकीट शिवाजीनगर येथील सवाई गंधर्व स्मारक येथे पाहण्यासाठी उपलब्ध राहणार आहे.

ग्वाल्हेर घराण्याच्या गायिका शाश्वती मंडल यांचा स्वराविष्कार सादर झाला. त्यांच्या गायकीने महोत्सवात रंग भरले. महोत्सवाच्या उत्तरार्धात उस्ताद अमजद अलीखाँ यांच्या सरोद वादनाने रंग भरले. तंतुवाद्याच्या मोहक तारा छेडत त्यांनी रसिकांच्या हृदयावर पकड घेतली.

''पुण्यात आलो त्यावेळी मला मराठी भाषेतले एक अक्षरही माहिती नव्हते. मी जेव्हा पं. भीमसेन जोशी यांना याबद्दल बोललो त्यावेळी पंडितजी म्हणाले, “तुम्ही गाणे उत्तम करा, इथले लोक तुम्हाला काहीही कमी पडू देणार नाही’’ ते खरेच होते. आज मिळालेला वत्सलाबाई जोशी पुरस्कार मी पुणेकरांना समर्पित करतो. - पं. उपेंद्र भट, ज्येष्ठ गायक''

''बंगाल, दिल्ली इथे अजूनही रात्रभर मैफली होतात. पुण्यात मात्र दहा वाजता मैफल बंद करावी लागते. माझी येथील प्रशासन, अधिकाऱ्यांना विनंती आहे की, संगीताच्या मैफलीसाठी वेळेचे बंधन नसावे. - उस्ताद अमजद अलीखाँ, ज्येष्ठ सरोदवादक''

आज महोत्सवाचा दुसरा दिवस

किराणा घराण्याचे दिल्लीस्थित गायक अविनाश कुमार यांच्या गायनाने याची सुरुवात होईल. त्यानंतर सरोदवादक उस्ताद अली अकबरखाँ यांचे पुत्र आलमखाँ यांचे सरोदवादन होईल. दिवंगत पं. राजन मिश्रा यांचे बंधू पं. साजन मिश्रा व त्यांचे पुत्र स्वरांश मिश्रा हे यानंतर सहगायन करतील. दुसऱ्या दिवसाचा शेवट व्हायोलिन वादक एन. राजम, त्यांच्या कन्या संगीता शंकर आणि नाती रागिणी व नंदिनी शंकर यांच्या व्हायोलिन वादनाने होईल.

Web Title: Beginning of the 68th Sawai Swarayjna from the confluence of melody rhythm and rhythm

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.