जिल्ह्यात पोस्टल मतदानाला सुरुवात
By admin | Published: February 16, 2017 03:37 AM2017-02-16T03:37:10+5:302017-02-16T03:37:10+5:30
जिल्हा परिषद, पंचायत समिती व पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकांमधील निवडणुकांचे चित्र आता स्पष्ट झाले असून, मतपत्रिका
पुणे : जिल्हा परिषद, पंचायत समिती व पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकांमधील निवडणुकांचे चित्र आता स्पष्ट झाले असून, मतपत्रिका छापून तयार झाल्या आहेत. यामुळे निवडणूक प्रशासनाने पोस्टल मतदानाची प्रक्रिया सुरू झाली केली आहे. शहर आणि जिल्ह्यातील निवडणूककामासाठी नियुक्त केलेल्या तब्बल ६५ हजार कर्मचाऱ्यांना पोस्टल मतदान करण्याची संधी देण्यात आली असल्याची माहिती जिल्हा परिषद निवडणूक समन्यवय अधिकारी विक्रात चव्हाण यांनी दिली.
राज्य निवडणूक आयोगाने निवडणुकीच्या कामासाठी नियुक्त करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांना आपला मतदानाचा हक्क बजाविता यावा, यासाठी पोस्टल मतदानाचा अधिकार दिला आहे. यामध्ये निवडणुकीच्या कामासाठी कर्मचाऱ्यांना नियुक्तीपत्र देतानाच पोस्टल मतदान करण्यासाठीच्या अर्जांचे वाटप करण्यात आले.
पोस्टल मतदान २३ फेबु्रवारीपर्यंत सकाळी ८.३० वाजेपर्यंत संबंधित निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचले तरी ग्राह्य धरण्यात येणार असल्याचे चव्हाण यांनी स्पष्ट केले. परंतु मतदानपत्रिका मतदारांपर्यंत पोहोचविणे व मतदान करून पुन्हा संबंधित अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी खूपच कमी आहे. त्यामुळे ६५ हजार कर्मचाऱ्यांचे मतदान कारणी लागणार का, हे २३ फेबु्रवारीलाच स्पष्ट होणार आहे.