पुरंदर उपसा योजनेतून चार दिवसांनंतर पाणी सोडण्यास सुरुवात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 11, 2018 10:52 PM2018-11-11T22:52:51+5:302018-11-11T22:53:02+5:30
दिवाळीच्या सुटीत होती योजना बंद : वाघापूरला पोहोचले पाणी, दुष्काळात ठरणार फायदेशीर
भुलेश्वर : पुरंदर तालुक्याला वरदान ठरणारी पुरंदर उपसा जलसिंचन योजना दिवाळी सुट्टीनंतर पुन्हा सुरू करण्यात आली. योजनेचे पाणी वाघापूर येथील पंप गृहाजवळ दुपारी सव्वा बारा वाजता आले. चार दिवसांनंतर योजना सुरू झाल्याने पाण्याची मागणी केलेल्या शेतकऱ्यांनी आनंद व्यक्त केला.
पुरंदर तालुक्यात दिवसेंदिवस दुष्काळी परिस्थिती वाढू लागली आहे. त्यात पुरंदरच्या पूर्व भागात तर तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागायचा. मात्र, पुरंदर उपसा जलसिंचन योजना सुरू झाली आणि काही अंशी दुष्काळीची तीव्रता कमी झाली. त्यात ८१ टक्के वीजबिलाचा वाटा सरकारने उचलल्याने फक्त १९ टक्के वीजबिल लाभार्थी गावातील शेतकºयांना भरावे लागत आहे. यामुळे सध्या पुरंदर उपसा जलसिंचन योजनेच्या पाण्याच्या मागणीत वाढ झाली आहे.
पुरंदर उपसा जलसिंचन योजनेने पुरंदर तालुक्यातील १४ हजार ४५०, दौंड तालुक्यातील ३ हजार ७६०, हवेली तालुक्यातील ८९०, तर बारामती तालुक्यातील ६ हजार ४९८ असे २ लाख ५६ हजार ४९८ हेक्टर क्षेत्र ओलीताखाली आले आहे. सध्या या योजनेचे दोन पंप सुरू असून ४ हजार ५०० लिटर पाणी प्रति सेकंदाला मिळत आहे. सध्या रब्बी हंगामातील पाणी सुरू आहे. या योजनेचे पाणी मिळवण्यासाठी लाभार्थी शेतकºयांकडून रितसर अर्ज भरुन घेण्यात येत आहेत. दिवसेंदिवस दुष्काळी परिस्थिती वाढू लागली आहे. आता कसेबसे जगण्यासाठी पुरंदर उपसा जलसिंचन योजना हाच एक पर्याय उरला आहे. सध्या मागणी वाढल्याने लाभार्थी शेतकºयांना पाणी मिळण्यास उशीर होत आहे. यामुळे ही योजना एकही दिवस बंद राहणार नाही याची सर्वांनीच काळजी घेणे गरजेचे आहे. यामुळे मागणीनुसार प्रत्येक शेतकºयांना लवकरात लवकर पाणी मिळेल.
टंचाईमधून पाणी सोडणे गरजेचे
४पुरंदर उपसा जलसिंचन योजना सुरू झाल्यापासून पुरंदर तालुक्यातील पिण्याच्या टँकरची संख्या कमी झाली आहे. गावातील पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून गावचे सरपंच, उपसरपंच पाण्याचे पैसे भरून गावाजवळील तलाव बंधारे भरुन घेत आहेत. यामुळे गावच्या सार्वजनिक विहिरी, कुपनलिका यांची पाण्याची पातळी वाढत आहे. यामुळे टँकरची मागणी करण्यापेक्षा पुरंदर उपसा जलसिंचन योजना सुरळीत चालू राहणे गरजेचे आहे. सध्या पुरंदर तालुक्यात दुष्काळी परिस्थिती असल्याने टंचाईतून पुरंदर तालुक्याला मोफत पाणी मिळण्याची मागणी लाभार्थी गावातीलशेतकºयांनी केली आहे.
सध्या पाण्याच्या मागणीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. यामुळे सर्वसामान्य शेतकरी या पाण्याकडे टक लावून बसला आहे. सर्वसामान्यांना सुरळीत पाणी देण्यासाठी काहीही झाले तरी ही योजना एकही दिवस बंद राहता कामा नये, तसे आदेश महाराष्ट्रचे जलसंपदा व जलसंधारण मंत्री विजय शिवतारे यांनी पंपहाऊसवर झालेल्या शेतकरी व अधिकारी यांच्या आढावा बैठकीत दिले होते.