जंबो लसीकरण केंद्र सुरु करा: भाजप नगरसेवकाची महापौरांकडे मागणी.
By ऑनलाइन लोकमत | Published: March 24, 2021 06:38 PM2021-03-24T18:38:40+5:302021-03-24T19:26:04+5:30
मुंबईचा धर्तीवर जम्बो लसीकरण केंद्र सुरु करावे नगरसेवकाची भूमिका.
पुणे शहराला लवकरात लवकर कोव्हिड मुक्त करण्यासाठी जम्बो कोव्हिड सेंटरच्या धर्तीवर जम्बो लसीकरण केंद्र उभारण्याची मागणी पुण्यातील भाजप नगरसेवकाने केली आहे. नगरसेवक आदित्य माळवेयांनी महापौरांना पत्र देत लवकरात लवकर या मागणीची दखल घ्यावी अशी विनंती केली आहे. या केंद्रावर जास्तीत जास्त नागरिकांचे लसीकरण होऊ शकते ,तसेच लसीच्या क्षमतेचा साठाही मोठ्या प्रमाणावर करता येऊ शकतो ,त्यामुळे असे केंद्र महापालिकेने सुरु करावे अशी त्यांची भूमिका आहे.
गेल्या काही दिवसांमध्ये कोरोना रुग्णांची संख्या वाढते आहे. त्यातच लसीकरण केंद्र सुरु झालेली असली तरी तिथे नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. कोरोनाच्या वाढत्या पार्श्वभूमीवर या केंद्राची गरज आहे. मार्च महिन्यात कोरोना रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होताना दिसत आहे. एका दिवसाला ७००, ८०० च्या दरम्यान रुग्ण आढळून येत होते. पण सद्यस्थितीत तोच आकडा तीन हजारांच्या आसपास पोहोचला आहे. त्यामध्ये ८० ते ८५ टक्के रुग्ण गृहविलगीकरणात आहेत. मात्र रुग्णांची संख्या थांबण्याचे नाव घेत नाहीये. म्हणून महापालिकेने सोमवारपासून जम्बो कोव्हिडं सेंटर सुरू केले आहे. त्याच प्राश्वभूमीवर असे लसीकरण केंद्र देखील सुरु केले जावे अशी मागणी माळवे यांनी केली आहे.
एकीकडे महापालिका रुग्णालयातील बेड वाढवण्याच्या प्रयत्नात आहे. तर दुसरीकडे लसीकरण मोहिमेलाही वेगाने सुरुवात झाली आहे. शहरातील सरकारी रुग्णालयाबरोबरच खासगी रुग्णालयातही लसीकरण चालू आहे. कोव्हक्सिन आणि कोव्हीशिल्ड अशा दोन प्रकारच्या लसी उपलब्ध आहेत. तीन टप्प्यापर्यंत लसीकरण येऊन पोहोचले आहे.
आता एक एप्रिलपासून ४५ वर्षांवरील सर्व नागरिकांसाठी लसीकरण चालू होणार आहे. पुढच्या महिन्यापासून शहरातील रुग्णालये आणि लसीकरण केंद्र यांच्यावर ताण येण्याची शक्यता आहे. जम्बो लसीकरण केंद्र चालू केल्याने नागरिकांना आणि महापालिका दोघांनाही फायदा होण्याची शक्यता आहे. तसेच महापालिकेवर अतिरिक्त कामाचा ताणही येणार नाही.