शिवसेनेच्या वतीने मुख्यमंत्र्यांचा निषेध, मागासवर्गीय असल्याने आमदारांवर अन्याय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 11, 2019 02:43 AM2019-01-11T02:43:44+5:302019-01-11T02:43:55+5:30
शहरातील विकासकामांचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते बुधवारी झाले.
पिंपरी : शहरातील विकास कामांच्या उद्घाटन कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेना आमदार गौतम चाबुकस्वार यांना बोलू दिले नाही. पिंपरी या मागासवर्गीय मतदार संघाच्या आमदारांना बोलू न देणे हा त्यांचावरील अन्याय असून, आम्ही शिवसेनेतर्फे घटनेचा निषेध करतो, अशी माहिती श्रीरंग बारणे यांनी दिली.
शहरातील विकासकामांचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते बुधवारी झाले. यावेळी भाजपाचे आमदार लक्ष्मण जगताप व महेश लांडगे यांना कार्यक्रमात बोलण्याची संधी देण्यात आली. परंतु, शिवसेनेचे पिंपरी मतदारसंघाचे आमदार गौतम चाबुकस्वार यांनी दोन मिनिटे बोलू देण्याची विनवणी मुख्यमंत्र्यांकडे केली. मात्र, त्यांना बोलण्यापासून रोखण्यात आले. या घटनेचे छायाचित्र व बातमी केवळ दैनिक ‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध झाली.
पिंपरी मतदार संघातील विविध संस्था व संघटनांनी या घटनेचा निषेध नोंदविला आहे. तसेच, खासदार श्रीरंग बारणे व आमदार गौतम चाबुकस्वार यांनी या घटनेचा निषेध करीत मुख्यमंत्र्यांनी अन्याय केल्याची भावना गुरुवारी पत्रकार परिषद घेऊन गुरुवारी व्यक्त केली. महापालिकेत भाजपाची सत्ता आल्यापासून त्यांच्या पदाधिका-यांकडून प्रोटोकॉल पाळला जात नाही. त्यामुळे मी महापालिकेच्या एकाही कार्यक्रमाला जात नाही, असे बारणे यांनी स्पष्ट केले.
आयुक्तालयाचे श्रेय शिवसेनेचे
पोलीस आयुक्तालयाचे पूर्ण श्रेय शिवसेनेचे आहे. या विषयांवर अनेकदा लक्षवेधी व तारांकित प्रश्न उपस्थित करून आयुक्तालयाचा प्रश्न मार्गी लावला आहे. परंतु, उशिरा काही पक्षाचे लोक जागे झाले. मात्र, आयुक्तलायचे श्रेय घेण्यासाठी पुढे येत आहेत, अशी टीका चाबुकस्वार यांनी थेट नाव न घेता शहरातील भाजपाच्या आमदारांवर केली.
माझ्या मतदारसंघात मोठा मतदार झोपडीवासीय आहे. त्यांचे पुनर्वसन व प्राधिकरणबाधितांना १२.५ टक्के परतावा हे महत्त्वाचे प्रश्न मला मांडायचे होते. मुख्यमंत्र्यांना मी काय बोलणार हे माहिती होते; कारण आठ महिन्यांपासून त्यांच्या टेबलवर ही फाईल मंजुरीच्या प्रतीक्षेत आहे. गोरगरिबांचे प्रश्न मांडण्यासाठी मला नकार देऊन त्यांनी माझ्यावर अन्याय केला आहे.
- गौतम चाबुकस्वार, आमदार, पिंपरी