Pune Ambil Odha Slum: पुणे महापालिकेच्या अधिकाऱ्यांचे वागणे मुख्यमंत्र्यांच्या प्रतिमेला तडा देणारं; संजय राऊत यांची टीका
By ऑनलाइन लोकमत | Published: June 25, 2021 11:34 AM2021-06-25T11:34:47+5:302021-06-25T11:44:40+5:30
पालिकेत सत्ता कोणाचीही असो. प्रशासनाने इतक कठोर होता कामा नये असाही त्यांचा सल्ला
पुणे: पुणे महानगरपालिकेने काल आंबिल ओढा परिसरातील अतिक्रमण केलेल्या झोपड्यांवर कारवाई केली. पावसाळ्यात कारवाईला परवानगी नसतानाही स्थानिक लोकांची परवा न करता थेट वस्तीत जेसीबी घुसवला. अनेक नागरिक बेघर झाले. यावर शिवसेना नेते संजय राऊत यांनी निषेध व्यक्त करत टीका केली आहे.
''पुणे महापालिकेचे हे काम महाराष्ट्राच्या परंपरेला न शोभणारे असून अधिकाऱ्यांचे अशा भयंकर पद्धतीचे वागणे हे मुख्यमंत्र्यांच्या प्रतिमेला तडा देण्यासारखं आहे'' असे ते म्हणाले. पालिकेत सत्ता कोणाचीही असो. प्रशासनाने इतक कठोर होता कामा नये असा सल्लाही त्यांनी यावेळी दिला आहे. आज सकाळी मुंबईत समाजमाध्यमांसमोर ते बोलत होते.
काळ सकाळी पुण्यातील आंबील ओढा परिसरात पुणे महापालिकेने घाईघाईने झोपड्पट्टीवर अतिक्रमण कारवाई केली. सत्ताधारी राजकीय नेते , नगरसेवक त्याठिकाणी फिरकले नाहीत. वस्तीतून लहान मुलांपासून ज्येष्ठांचा आक्रोष दिसून आला. त्यांना कुठलीही पूर्वकल्पना न दिल्याचे नागरिक म्हणत आहेत. त्याच क्षणी नागरिक विरोध करूनही पोलीस आणि महापालिका अधिकारी ऐकत नव्हते. हतबल झालेल्या नागरिकांना अश्रूही अनावर झाले नाहीत.
यावर बोलताना राऊत म्हणाले, ''पुणे मनपाने काल जे अमानवीय काम केलं. त्याचा मी निषेध करतो. प्रशासनाने सत्ताधारी यांच्या सल्ल्याने घाईघाईने निर्णय घेत कुणाचीही पर्वा न करता घरांवर जेसीबी फिरवला. लोकांचा विरोध आणि आक्रोष पाहून तरी माणुसकी दाखवली पाहीजे. असं मला तरी वाटते.''
संजय राऊत यांची सामनाच्या अग्रलेखातूनही पुणे महापालिका अधिकाऱ्यांवर सडकून टीका
पुण्यात ओढ्यालगत असणाऱ्या घरांवर अतिक्रमण करण्यात आले. प्रशासनाने कोणताही मागचापुढचा विचार न करता गरीबांना रस्त्यावर आणले. या सगळ्या प्रकरणावर आजच्या सामना अग्रलेखातून पुणे महापालिकेतल्या सत्ताधाऱ्यांवर सडकून टीका करण्यात आली आहे. पुण्याची सूत्रे बिल्डर्स, जमीन माफियांच्या ताब्यात आहे. गरीबांच्या घरांवर बुलडोझर चालवणं हा संतापजनक, तितकाच मन हेलावून टाकणारा प्रकार आहे, असं त्यांनी अग्रलेखात म्हटलं आहे.