असभ्य वर्तन करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याच्या विरुद्ध धरणे आंदोलन मागे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2021 04:11 AM2021-01-25T04:11:28+5:302021-01-25T04:11:28+5:30
इंदापूर : महिलेशी असभ्य वर्तन करणार्या पोलीस कर्मचाऱ्यांविरुद्ध कारवाई करावी, या मागणीसाठी पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षकांकडे धाव घेतली. सदर ...
इंदापूर : महिलेशी असभ्य वर्तन करणार्या पोलीस कर्मचाऱ्यांविरुद्ध कारवाई करावी, या मागणीसाठी पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षकांकडे धाव घेतली. सदर कर्मचाऱ्यांविरुद्ध कायदेशीर कारवाई न झाल्याने, इंदापूर पोलीस ठाण्यासमोर ( दि. २३ ) जानेवारी पासून बेमुदत धरणे आंदोलन छेडण्यात आले. मात्र पोलीस अधीक्षकांनी त्या पोलीस कर्मचाऱ्याची चौकशी सुरू केली व चौकशी करून कडक कारवाई करण्याचे अश्वासन दिल्यानंतर बहुजन मुक्ती पार्टी व महिलांनी धरने आंदोलन मागे घेतले आहे. सिमरन वसीम शेख म्हणाल्या, मंगळवार ( दि. १९ जानेवारी २०१९) रोजी दुपारी ३ वाजता घरात हॉलमध्ये जेवण करत असताना, पती, सासू व इतर घरातील व्यक्ती नसताना, स्वयंपाक घराच्या दरवाजाचा आवाज आला. अनोळखी व्यक्ती घरामध्ये आली त्यांनी दरवाज्याची कडी लावून घेतली; त्यांना विचारले असता त्यांनी पोलीस आहे? असे सांगितले. सदर व्यक्तीने मला विचारले, तुझा नवरा कुठे आहे? व त्याचा मालक कुठे लपला आहे. हे सांग नाहीतर तुला उचलून घेऊन जाईन मी असे तो व्यक्ती म्हणाला. सदर प्रश्नावर मी उत्तरले अगोदर दरवाजा उघडा मला बाहेर जाऊ द्या! तरीदेखील त्या पोलिसांनी दरवाजा उघडला नाही त्यानंतर आरडाओरडा करायला लागले तेव्हा त्यांनी माझ्या हाताला धरून दरवाजा पासून लांब ढकलून दिले.
त्यानंतर ते बाहेर आले व त्यांच्या पाठीमागे मी आल्यानंतर पाहिले असता आणखीन तीन लोक घराच्या पोर्चमध्ये थांबलेले होते. ते सर्वजण म्हणाले हिचा नवरा नाहीतर हिला घेऊन चला असे म्हणून ते सर्व तेथून निघून गेले. सदर प्रकार मी माझ्या चुलत जावांना सांगितले. त्यानंतर आम्ही चार वाजण्याच्या सुमारास पोलीस स्टेशनला गेलो. त्या ठिकाणी सुमारे तीन तास बसून ठेवल्यानंतर काही तक्रार घेतली नाही. सदर प्रकार माझ्या घरी कोणी नसताना पोलिसांनी घडवला. कायद्याच्या रक्षकांनी असे प्रकार केले तर आम्ही न्याय कोठे मागायचा ? असा सवाल सिमरन शेख यांनी केला आहे.
सदर पोलीस कर्मचाऱ्यांच्या विरुद्ध कारवाई न झाल्याने २३ जानेवारी रोजी शेख कुटुंबीय इंदापूर पोलीस ठाण्यासमोर बेमुदत धरणे आंदोलन धरले होते. यावेळी माजी नगराध्यक्ष ऍड. रत्नाकर मखरे, ऍड. राहुल मखरे व संजय कांबळे, संजय शिंदे, वसीम शेख, सुरज धाइंजे, ऍड.किरण लोंढे व जवळपास वीस महिलांनी बेमुदत धरणे आंदोलनात सहभाग घेतला होता.
सायंकाळी ६ वाजता इंदापूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अजित जाधव, गणेश झरेकर, रोशन मुठेकर, शंकर वाघमारे यांनी महिला पोलीस कॉन्स्टेबल शशिकला कुंदे यांच्या हस्ते आंदोलक महिलांना पत्र देवून आंदोलन मागे घेण्याचे पत्र दिले. त्यांनतर आंदोलनाला स्थगिती देण्यात आली. यावेळी महिलांनी पोलीस प्रशासनाचे अभिनंदन केले.
पोलिस प्रशासनाने गुन्ह्यामध्ये पुराव्यांना महत्व देणे गरजेचे
पोलीस प्रशासनाला अनेक गुन्ह्यातील सबळ पुरावे देवून देखील, पोलीस प्रशासनातील वरिष्ठ पोलीस अधिकारी कारवाई करण्यास का धजावतात ? अनेकवेळा आम्ही सबळ पुरावे सादर करून देखील पोलीस कारवाई का करत नाहीत, हा खरा संशोधनाचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्याचबरोबर इंदापूर पोलीस स्टेशनमध्ये खोटे गुन्हे दाखल करून आर्थिक वसुली करण्याचे जे सत्र सुरू आहे, ते थांबले नाही तर पोलीस प्रशासनाला एक दिवशी नागरिकांच्या प्रचंड रोषाला सामोर जावे लागेल, असे बहुजन मुक्ती पार्टीचे राष्ट्रीय महासचिव ऍड. राहुल मखरे यांनी सांगितले.
इंदापूर येथे बेमुदत धरणे आंदोलन करणाऱ्या महिलांना आंदोलन मागे घेण्याचे पत्र देताना पोलीस प्रशासन