महामार्ग हस्तांतरण मागे

By admin | Published: May 20, 2017 05:08 AM2017-05-20T05:08:34+5:302017-05-20T05:08:34+5:30

महापालिका हद्दीतून जाणारे राष्ट्रीय महामार्ग महापालिकेकडे हस्तांतरित करण्याचा प्रस्ताव शुक्रवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत मागे घेण्यात आला. दरम्यान, महापालिकेच्या

Behind highway transfer | महामार्ग हस्तांतरण मागे

महामार्ग हस्तांतरण मागे

Next

- लोकमत न्यूज नेटवर्क

पिंपरी : महापालिका हद्दीतून जाणारे राष्ट्रीय महामार्ग महापालिकेकडे हस्तांतरित करण्याचा प्रस्ताव शुक्रवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत मागे घेण्यात आला. दरम्यान, महापालिकेच्या ताब्यात नसताना या रस्त्यांसाठी महापालिकेने कोट्यवधींचा खर्च केल्याबाबत ‘ताब्यात नसताना कोट्यवधींचा खर्च’ या मथळ्याखाली ‘लोकमत’मध्ये वृत्त प्रसिद्ध झाले होते.
सभेच्या अध्यक्षस्थानी महापौर नितीन काळजे होते. नाशिक फाटा ते मोशी इंद्रायणी नदीपर्यंतचा रस्ता तसेच किवळे मामुर्डी ते वाकड मुळा नदीवरील पुलापर्यंतचा रस्ता महापालिकेकडे हस्तांतरित करण्याचा प्रशासनाचा प्रस्ताव मंजुरीसाठी सर्वसाधारण सभेपुढे ठेवण्यात आला होता. दरम्यान शुक्रवारी
झालेल्या सभेत हा प्रस्ताव मागे घेण्यात आला.
महापालिका हद्दीतून जाणाऱ्या विविध सहा राष्ट्रीय महामार्गांपैकी नाशिकफाटा ते मोशी रस्ता आणि किवळे मामुर्डी ते वाकड मुळा नदीजवळील राष्ट्रीय महामार्ग ४ हे दोन रस्ते अद्याप महापालिकेकडे हस्तांतरित झालेले नाहीत. हे रस्ते सार्वजनिक बांधकाम विभागाकडून महापालिकेकडे हस्तांतरित झाले नसल्याने त्या रस्त्यांचा विकास तसेच देखभाल, दुरुस्तीची कामे महापालिका करीत नाही. असे महापालिका प्रशासनाचे म्हणणे आहे. असे असेल तर ज्या रस्त्यांच्या विकसनाचा, देखभाल दुरुस्तीचा अधिकार महापालिकेला नाही, त्या रस्त्यांवर १०० कोटींचे उड्डाणपूल प्रकल्प साकारले कसे? असा मुद्दा उपस्थित झाला होता.
दरम्यान, नाशिक फाटा ते मोशी आणि वाकड ते किवळे अद्याप हे रस्ते महापालिकेकडे हस्तांतरित झालेले नसतानाही या रस्त्यांवरील उड्डाणपूल प्रकल्पांसाठी महापालिकेने कोट्यवधींचा खर्च केला आहे.
यामुळे महापालिकेने कोट्यवधींच्या खर्चाची उधळपट्टी केल्याबाबतचे
वृत्त लोकमतने शुक्रवारी प्रसिद्ध
केले. त्यामुळे सर्वसाधारण सभेत प्रशासनाने हा विषय मागे घेण्याचा निर्णय घेतला.

आयुक्तांचे स्वागत
पिंपरी-चिंचवड महापालिकेचे नवनियुक्त आयुक्त श्रावण हर्डीकर यांचा शुक्रवारी सर्वसाधारण सभेत सत्कार करण्यात आला. पिंपरीच्या महापालिका आयुक्तपदी हर्डीकर रुजू झाल्यानंतर ही पहिलीच सर्वसाधारण सभा होती. त्यांचा सर्व गटनेत्यांच्या वतीने सत्कार करण्यात आला.

श्रद्धांजलीने सभा तहकूब
सर्वसाधारण सभा दिवंगत मान्यवरांना श्रद्धांजली वाहून अर्धा तासासाठी तहकूब करण्यात आली. केंद्रीय पर्यावरणमंत्री अनिक दवे, ज्येष्ठ अभिनेत्री रीमा लागू, पुण्याचे उपमहापौर नवनाथ कांबळे आदींना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

Web Title: Behind highway transfer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.