‘विवेकी होणे म्हणजे धर्माला सोडचिठ्ठी देणे नव्हे’ : डॅनियल मस्करणीस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2021 04:10 AM2021-05-24T04:10:46+5:302021-05-24T04:10:46+5:30
पुणे : सर्वसामान्य माणूस विवेकी असतोच. आपला विवेक जागृत ठेवत तो धर्माचे आचरण करत असतो व त्या विवेकी आचरणासाठी ...
पुणे : सर्वसामान्य माणूस विवेकी असतोच. आपला विवेक जागृत ठेवत तो धर्माचे आचरण करत असतो व त्या विवेकी आचरणासाठी प्रसंगी तो आपले प्राणही पणाला लावतो व त्यामुळेच समाज बदलण्यास चालना मिळते. ‘विवेकी होणे म्हणजे धर्माला सोडचिठ्ठी देणे नव्हे’ असे मत ख्रिस्ती धर्माचे अभ्यासक डॅनियल मस्करणीस यांनी व्यक्त केले.
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या डॉ. नरेंद्र दाभोलकर प्रशिक्षण केंद्राच्या वतीने 'ख्रिस्ती धर्मातील अंधश्रद्धा त्याचे निर्मूलन आणि विवेक' या विषयावर वसई येथील आयटी इंजिनियर डॅनियल मस्करणीस यांचे आॅनलाईन व्याख्यान आयोजिले होते. त्यावेळी ते बोलत होते.
प्रास्ताविकात महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्यकर्ते डॉ. हमीद दाभोलकर, म्हणाले, अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीवर नेहमीच आरोप केला जातो की अंनिस फक्त हिंदू धर्मातील अंधश्रद्धाच्या विरोधात काम करते. तसेच अंनिसला चर्चकडून निधी पुरविला जातो. पण हे आरोप निखालस खोटे आहेत. अंनिस सर्वच धर्मातील अंधश्रद्धाविरोधात आवाज उठवते. डॉ. नरेंद्र दाभोलकरांनी ठाणे जिल्ह्यातील वसई येथे दिलेल्या भाषणातून प्रेरणा घेत डॅनियल मस्करणीस, फ्रान्सिस अल्मेडा, उच्च न्यायालयातील जेष्ठ वकील व अंनिस वार्तापत्रावरील खटले उच्च न्यायालयात विनामोबदला लढविणारे अंनिसचे कार्यकर्ते अॅड. अतुल अल्मेडा यांनी प्रामुख्याने ख्रिस्ती धर्मातील अंधश्रद्धाविरोधात संघर्ष करणा-या ‘विवेक मंच’ची स्थापना केली व ‘माणूस मारला तरी विचार मरत नाही’ या न्यायाने हा मंच डॉ. दाभोलकरांच्या निर्घृण खुनानंतरही कार्यरत राहिला.
ख्रिस्ती धर्माच्या भारतातील प्रवेशबद्दल सांगताना डॅनियल मस्करणीस म्हणाले, दया,शांती, प्रेम हा येशूचा संदेश सांगणारा ख्रिस्ती धर्म युरोपियन मिशन-यांच्या माध्यमातून आल्यामुळे तो भारतीयांना परका वाटला व त्यांच्या मनात त्या धर्माबद्दल अनेक गैरसमज निर्माण झाले. त्यामुळे ख्रिस्ती धर्मातील अंधश्रद्धांचे स्वरूप समजावून देण्याआधी त्या धर्माच्या उगम, प्रसार, मतभेद व त्यातून निर्माण झालेले पंथ यांचा संक्षिप्त इतिहास त्यांनी सांगितला. येशूने ‘जूना करार’ या ग्रंथातील सनातनी मूल्याविरोधातील, कर्मकांडाविरोधातील विद्रोही आचार व त्याचा नवा करार व बायबल या ग्रंथावर पडलेला प्रभाव आणि रोमन कॅथालिक, आॅर्थोडॉक्स, प्रोटेस्टंट चर्च यांचे आचार यांची चिकित्सा करत, उदाहरणे देत त्यांनी धर्माचे मूळ विचार व चर्चच्या आचारातील विसंगती स्पष्ट केली व हीच विसंगती ख्रिस्ती धर्मातील अंधश्रद्धा व कर्मकांडे यांना कारणीभूत आहेत.
अध्यक्षीय समारोप फ्रान्सिस अलमेडा यांनी केला. हौसेरव धुमाळ यांनी आभार मानले. प्रशांत पोतदार यांनी सूत्रसंचालन केले.
--------------------------------------------------------------------------