बेळगावच्या आशा होताहेत धुसर - लक्ष्मीकांत देशमुख

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 14, 2018 03:47 AM2018-06-14T03:47:44+5:302018-06-14T03:47:44+5:30

महाराष्ट्रातील समाजकारण, राजकारण बदलत असताना विकास फक्त पश्चिम महाराष्ट्रापुरता मर्यादित राहिला. महाराष्ट्राने आम्हाला न्याय दिला नाही, ही भावना विदर्भ, मराठवाड्याच्या लोकांच्या मनात आजही घर करून आहे.

 Belgaon is hoping to get it - Laxmikant Deshmukh | बेळगावच्या आशा होताहेत धुसर - लक्ष्मीकांत देशमुख

बेळगावच्या आशा होताहेत धुसर - लक्ष्मीकांत देशमुख

Next

पुणे - महाराष्ट्रातील समाजकारण, राजकारण बदलत असताना विकास फक्त पश्चिम महाराष्ट्रापुरता मर्यादित राहिला. महाराष्ट्राने आम्हाला न्याय दिला नाही, ही भावना विदर्भ, मराठवाड्याच्या लोकांच्या मनात आजही घर करून आहे. आचार्य अत्रेंच्या पुढाकाराने साकार झालेले संयुक्त महाराष्ट्राचे स्वप्न, ओजस्वी पर्व विस्मरणात गेले आहे की काय, असा प्रश्न पडतो. बेळगाव महाराष्ट्रात येण्याच्या आशा धूसर होत चालल्या आहेत. महाराष्ट्र एकसंध राहू शकलेला नाही, अशी खंत संमेलनाध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख यांनी बुधवारी व्यक्त केली. विकासाचे समन्यायी वाटप झाले पाहिजे, अशीही अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
आचार्य अत्रे स्मृती प्रतिष्ठानतर्फे साहित्य सम्राट आचार्य अत्रे यांच्या ४९ व्या स्मृतिदिनानिमित्त साहित्य संमेलनाध्यक्षांचे महासंमेलन आणि गौरव समारंभ आयोजित करण्यात आला होता. या वेळी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलानाचे अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख, बाल मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष ल. म. कडू, आचार्य अत्रे स्मृती प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष अ‍ॅड. बाबूराव कानडे आदी मान्यवर उपस्थित होते.
अ‍ॅड. बाबूराव कानडे यांनी प्रास्ताविकात आचार्य अत्रेंच्या कार्यकर्तृत्त्वाला उजाळा दिला.

देशमुख म्हणाले, ‘बुद्धी आणि भावनेला आवाहन करणारे लेखन हे अत्रेंचे वैशिष्ट्य होते. त्यांच्या लेखनामुळे संयुक्त महाराष्ट्र चळवळ जोमदार झाली आणि महाराष्ट्र आकाराला आला. सध्या संयुक्त महाराष्ट्राचे स्वप्न विरले आहे. स्वतंत्र विदर्भ मागणी होत असून त्याला भाजपाचा पाठिंबा आहे. संयुक्त महाराष्ट्राच्या तत्त्वाचे पालन झाले नाही, हे वास्तव आहे. संयुक्त महाराष्ट्राच्या ध्येयापासून आपण किती दूर गेलो, याचे आत्मपरीक्षण केले पाहिजे. अत्रे यांच्याकडून निर्भयता शिकली पाहिजे.
लेखक हा समाजाचा आरसा असेल तर त्याने लेखनातून समाजाचे आक्रंदन, व्यथा मांडल्या पाहिजेत. अत्रे यांच्या ‘घराबाहेर’ नाटकावर पुढे महेश भट यांनी ‘अर्थ’ चित्रपटाची निर्मिती केली होती. आता काळ असा आहे की मोठे नेते होणार नाहीत. त्यामुळे समाजातील प्रत्येकाने मोठे होण्याचा प्रयत्न केला पाहिजे. शिक्षण, राजकारण या क्षेत्रात घसरण होत आहे. अत्रे यांच्या साहित्याचे वाचन, चिंतन, मनन करून त्यातून प्रेरणा घेतली पाहिजे. हे साहित्य नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्याची गरज आहे.’

बालसाहित्याची होतेय परवड
अत्रेंसारखा माणूस गेल्या १० हजार वर्षांत झाला नाही आणि पुढेही होणार नाही. त्यांच्यासारखे होणे हे येड्यागबाळ्याचे काम नव्हे. दिग्गजांची जयंती, स्मृतीदिन तात्पुरते साजरे होतात आणि नंतर विस्मरणात जातात. मुलांवर संस्कार करणारे साहित्य आजवर निर्माण झाले, मात्र मुलांना काय आवडते हे लक्षात घेतले जात नाही.
मूल हे स्वतंत्र व्यक्तिमत्त्व असते. त्याच्यावर मालकी हक्क न गाजवता त्याला केवळ पैलू पाडण्याची जबाबदारी पालकांची असते. काळाच्या ओघात मराठी भाषेचे मातेरे होत असून, बालसाहित्याची परवड होत आहे. आपली भाषा, संस्कृती जपली जाणार असेल तरच बालसाहित्याला चांगले दिवस येतील, असे ल. म. कडू याप्रसंगी म्हणाले.

Web Title:  Belgaon is hoping to get it - Laxmikant Deshmukh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.