भक्ति, भावगीतांच्या मैफलीने सांगता
By Admin | Published: April 11, 2016 12:26 AM2016-04-11T00:26:01+5:302016-04-11T00:26:01+5:30
श्री स्वामी समर्थ भक्त सेवासंघाने आयोजित केलेल्या महोत्सवाचा समारोप पंडित यशवंत देव यांच्या शिष्या मंजुश्री दिवाण आणि त्यांच्या सहकारी-कलावंतांनी सादर केलेला भक्तिगीते-भावगीतांचा कार्यक्रमाने झाला
निगडी : श्री स्वामी समर्थ भक्त सेवासंघाने आयोजित केलेल्या महोत्सवाचा समारोप पंडित यशवंत देव यांच्या शिष्या मंजुश्री दिवाण आणि त्यांच्या सहकारी-कलावंतांनी सादर केलेला भक्तिगीते-भावगीतांचा कार्यक्रमाने झाला.
पेठ क्रमांक २६ येथील कार्यक्रमास सेवा संघाचे अध्यक्ष आत्माराम डेरे, कार्याध्यक्ष लक्ष्मण काचोळे, सचिव श्याम बरिदे, उपाध्यक्षा मीनल डेरे, खजिनदार बाळकृष्ण करंदीकर, प्रतिमा डेरे, शकुंतला काचोळे यांची मुख्य उपस्थिती होती.
मैफलीचा प्रारंभ ‘प्रथम तुला वंदितो....’या गणेशस्तुतीने श्री दिवाण आणि शरद शिधये यांनी केला. ‘जय शारदे वागेश्वरी...’, हे शारदास्तवन मंजुश्री यांनी सादर केले. ‘देवाचिये द्वारी। उभा क्षणभरी...’ या शरद शिधये यांनी सादर केलेल्या पदाने अवघे वातावरण भक्तिमय झाले. ‘उलट्या नामे तरला वाल्या...’, या पौराणिकगीताच्या सादरीकरणातून माधुरी कोळपे यांनी मैफलीचा भक्तिरंग अजूनच गहिरा केला. संत तुकाराम महाराजांचा ‘सुंदर ते ध्यान, उभे विटेवरी...’, हा अभंग सादर केला. ‘संतचरणरज, लागता सहज, वासनेचे बीज, जळोन जाय...’, या अभंगालादेखील शिधये यांनी न्याय दिला. ‘चांदणे शिंपित जाशी...’, ‘चालता तू चंचले...’ या आशा भोसले यांच्या मूळ आवाजातील गीत माधुरी कोळपे यांनी सादर केले.
थकले रे नंदलाला...’, ‘विकत घेतला श्याम...’ या गीतांना दाद मिळाली. ‘केव्हातरी पहाटे...’ या गझलेला आणि ‘कट्यार काळजात घुसली...’ मधील ‘घेई छंद मकरंद...’ला ‘वन्स मोअर’चा दिला. ‘शुक्रतारा मंद वारा...’ या युगलगीताने मैफलीची सांगता केली. (प्रतिनिधी)