तुम्ही विश्वास ठेवा, आपण या पुरावर कायमस्वरूपी तोडगा काढू; मुख्यमंत्री शिंदेंचे पुणेकरांना आश्वासन
By ऑनलाइन लोकमत | Published: August 5, 2024 04:50 PM2024-08-05T16:50:09+5:302024-08-05T16:51:08+5:30
विकास करण्यासाठी काही धोरणात्मक निर्णय घ्यावे लागतील, तेव्हा सहकार्याची भूमिका तुम्हाला घ्यायची आहे
पुणे: पुण्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाचा जोर कायम राहिलाय. त्यामुळे पुण्यातील धरणे पूर्णपणे भरण्याच्या मार्गावर आहेत. अशा वेळी खबरदारी म्हणून धरणातून मोठ्या प्रमाणात पाणी सोडले जात आहे. त्यामुळे नदीकाठी राहणाऱ्या भागात पूरपरिस्थिती निर्माण होतीये. पुण्याच्या नदीकाठच्या भागात राहणाऱ्या लोकांना या पुराचा मोठा फटका बसला आहे. या पुरामुळे नागरिकांचे प्रचंड नुकसान झाले. त्यांचे संसार पाण्यात वाहून गेले. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या घटनेची दखल घेत पूरपरिस्थिती निर्माण झालेल्या भागाला भेट दिली. त्यानंतर सुप्रिया सुळे, राज ठाकरे, मुरलीधर मोहोळ, आदित्य ठाकरे यांनीसुद्धा भेट देऊन नागरिकांशी संवाद साधला. आज राज्याचे मुख्यमंत्रीएकनाथ शिंदे पुरग्रस्तांशी चर्चा कारण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेपुणे दौऱ्यावर आहेत. सांगवीत नागरिकांशी संवाद साधल्यानंतर शिवाजीनगर भागातील पाटील इस्टेटला भेट दिली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी या भागातील नागरिकांना शब्द दिला आहे. तुम्ही विश्वास ठेवा आपण या पुरावर कायमस्वरूपी तोडगा काढू असे आश्वासन त्यांनी दिले आहे.
एकनाथ शिंदे म्हणाले, तुमच्या घराचा त्रास आता दूर झाला पाहिजे असं धोरण करायचं आहे. आपल्याला तात्पुरती मदत मिळते हे ठीक आहे. परंतु कायमस्वरूपी पुराचा धोका दूर करण्याचं काम सरकार करणार आहे. म्हणून सरकारच्या वतीने धोरण आणू, नवीन डीसीआर आणू, विकास करण्यासाठी काही धोरणात्मक निर्णय घ्यावे लागतील असे मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले आहे. मी जे बघण्यासाठी आलो आहे. त्याचे योग्य प्रकारे नियोजन करू. तुम्ही प्रशासनाला सहकार्य करण्याची भूमिका घ्यायची आहे. आपल्याला संकटात सगळ्या लोकांनी मदत केली. आपल्या सर्व लोकप्रतिनिधी, नगरसेवक, आमदार, खासदार तेव्हा मदतीला आले. महापालिका, आर्मी, एनडीआरएफ, एनजीओ सन्था सगळ्यांनी मदत केली. त्यांना सगळ्यांना मी धन्यवाद देतो. तुम्ही विश्वास ठेवा, खात्री बाळगा आपण नक्कीच कायस्वरूपी तोडगा काढू. आता आम्ही पूरग्रस्त भागातील नागरिकांना काही कमी पडू देणार नाही. प्रशासन सर्वतोपरी काळजी घेण्यासाठी सज्ज आहे.