पुणे जिल्ह्यात तब्बल आठ महिन्यांनी शाळेची घंटा वाजली; विद्यार्थ्यांचा अल्प प्रतिसाद
By ऑनलाइन लोकमत | Published: November 23, 2020 08:54 PM2020-11-23T20:54:58+5:302020-11-23T21:01:29+5:30
कोरोनाच्या धास्तीने शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांचा अल्प प्रतिसाद मिळाला.
पुणे : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बंद करण्यात आलेल्या शाळांची पहिली घंटा तब्बल आठ महिन्यांनंतर सोमवारी वाजली. जिल्ह्यातील ९ वी ते १२ वीच्या १हजार २४६ पैकी २१५ शाळा शासकीय नियमांचे पालन करत सुरू झाल्या. कोरोनाच्या धास्तीने शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांचा अल्प प्रतिसाद मिळाला. २ लाख ३८ हजार ४१ विद्यार्थ्यांपैकी केवळ ९ हजार ४३१ विद्यार्थी उपस्थित होते. केवळ ४ टक्केच विद्यार्थी उपस्थित राहिले. उर्वरित शाळा येत्या १ डिसेंबरपर्यंत टप्प्याटप्प्याने सुरू केल्या जाणार आहेत, अशी माहिती जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा निर्मला पानसरे आणि उपाध्यक्ष रणजित शिवतरे यांनी दिली. विद्यार्थ्यांना शाळेत पाठविण्याबाबत काही पालक सकारात्मक असले तरी काही पालकांमध्ये अजूनही भीतीचे वातावरण असल्याचे चित्र जिल्ह्यात होते.
राज्य शासन व स्थानिक प्रशासनाने प्रसिद्ध केलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार सोमवारी (दि २३) जिल्ह्यातील इयत्ता नववी ते बारावीपर्यंतचे वर्ग प्रत्यक्षात सुरू करण्यात आले. या बाबत जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा निर्मला पानसरे आणि उपाध्यक्ष रणजित शिवतरे यांनी माहिती पत्रकार परिषदेत दिली. यावेळी माध्यमिकचे शिक्षणाधिकारी गणपत मोरे, तसेच प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी सुनिन कुऱ्हाडे उपस्थित हाेते.
सोमवारपासून शाळा सुरू होणार असल्याने आदल्या दिवशीच बहुतांश सर्व शाळांची स्वच्छता, निर्जंतुकीकरण करण्यात आले होते. शाळेत उपस्थित राहण्यापूर्वी शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना कोरोनाचाचणी अनिवार्य करण्यात आली होती. जिल्ह्यात असलेल्या १५ हजार ८५४ शिक्षकांपैकी ६ हजार ५५६ शिक्षक आणि कर्मचाऱ्यांच्या चाचण्या रविवारपर्यंत पूर्ण झाल्या. यापैकी २९ जण पॉझिटिव्ह आढळले.
स्थानिक प्रशासन, आरोग्य विभाग व शिक्षण विभागाच्या संयुक्त विद्यमाने जिल्ह्यातील शिक्षकांच्या कोरोना चाचण्या घेतल्या जात आहेत. सर्व शिक्षकांची कोरोना तपासणी करण्यास वेळ लागणार आहे. मात्र, तपासणीचे काम पूर्ण करून येत्या १ डिसेंबरपर्यंत सर्व शाळा सुरू केल्या जातील, असे शिक्षण अधिकारी गणपत मोरे यांनी सांगितले.
मोरे म्हणाले, पहिल्या दिवशी शासकीय नियमावलीनुसार विद्यार्थ्यांची तपासणी करून शाळेत सोडण्यात आले. ऑक्सिमिटर आणि थर्मामिटरच्या साह्याने तपासणी करण्यात आली. विद्यार्थ्यांना एक बाक सोडून बसविण्यात आले. शाळा काही तास सुरू राहणार आहेत. त्यात विद्यार्थ्यांना एकमेकांच्या जवळ येऊ दिले जाणार नाही. मधली सुट्टीही रद्द करण्यात आली आहे. मैदानी वर्गही रद्द करण्यात आले आहेत. शाळा सुटल्यावर विद्यार्थ्यांना थेट घरी पाठवले जाणार आहे.
————
१० हजार ५०० पालकांनी भरले संमती पत्र
शाळा सुरू करण्यापूर्वी पालकांकडून संमती पत्र मागवण्यात आले होते. जवळपास १० हजार ५०० पालकांनी हे पत्र शिक्षण विभागाला पाठवले. यात काही पालक हे शाळा सुरू करण्यास अनुकूल होते. तर काही पालकांच्या मते लस येईपयर्यंत शाळा बंद ठेवण्याची मागणी करत पाल्यांना शाळेत पाठवणार नसल्याचे म्हटले आहे.
जिल्हा परिषद घेणार विद्यार्थ्यांच्या आरोग्याची जबाबदारी
कोरोनाचा संसर्ग होईल या भितीने पालक आपल्या पाल्यांना शाळेत पाठवण्यास धजावत नाहीत. मात्र, कोरोनाचा संसर्ग होऊ नये यासाठी जिल्हा परिषद पूर्णपणे खबरदारी घेत आहे. त्यानंतरही विद्यार्थ्यांना शाळेत कोरोनाची लागण झाल्यास त्याची जबाबदारी जिल्हा परिषद स्विकारेल अशी माहिती अध्यक्ष निर्मला पानसरे व उपाध्यक्ष रणजित शिवत यांनी दिली. शिवतरे म्हणाले, नववी ते बारावीपर्यंतच्या शाळा सुरू झाल्या. पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांची उपस्थिती कमी होती, मात्र पुढील काही दिवसांमध्ये ही संख्या वाढेल. याशिवाय सर्व शाळांचे निर्जंतुकीकरण, स्वच्छता करण्यात आलेली आहे. सर्व उपाययोजना करण्यात आलेल्या आहेत. विद्यार्थ्यांची थर्मलगन, पल्स ऑक्सिमीटरने तपासणी करून सोशल डिस्टिन्सिंगचे पालन करण्यात आले. तरी देखील विद्यार्थ्याला कोरोनाचा संसर्ग झाला तर त्याची उपचाराची जबाबदारी जिल्हा परिषद घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.
——-
चौकट
जिल्ह्यातील शाळा दृष्टीक्षेपात
शाळा - १२४६
शाळा सुरू - २१५
शिक्षक - ११०३३
शिक्षकेतर कर्मचारी - ४८२१
एकूण विद्यार्थीसंख्या - २३८०४१
चौकट
तालुका सुरू झालेल्या शाळांची संख्या
बारामती ३
भोर १०
दौंड ६
हवेली ३७
इंदापूर ३३
जुन्नर २०
खेड १६
मावळ १४
मुळशी १५
पुरंदर ३६
शिरूर ८
आंबेगाव १०
वेल्हा ७