पुण्यातील लक्ष्मी रस्त्यावर व्यापाऱ्यांचे घंटानाद आंदोलन; उद्यापासून दुकाने ७ वाजेपर्यंत उघडी ठेवणार
By ऑनलाइन लोकमत | Published: August 3, 2021 12:32 PM2021-08-03T12:32:19+5:302021-08-03T12:46:45+5:30
आम्हाला अटक करून आमच्यावर कारवाई झाली. तरी आम्ही त्यास सामोरे जाण्यास तयार असल्याची भूमिका शहरातील व्यापाऱ्यांनी घेतली आहे.
पुणे : पुण्यात व्यापारी महासंघाने जागोजागी आज घंटानाद आंदोलनाला सुरूवात केली आहे. लॉकडाऊनमधील निर्बंध शिथिल करून शहरातील दुकानांची वेळ वाढून देण्याबाबत निर्णय घेण्यासाठी यातून सरकारचे लक्ष वेधणार आहेत.
शहरातील कोरोना परिस्थिती गेल्या चार महिन्यांपासून नियंत्रणात येत आहे. रूग्णसंख्या सातत्याने कमी झालेली असतानाही सरकारने व्यवसायांच्या वेळांमध्ये कोणताही बदल केला नाही़. त्यामुळे झोपचे सोंग घेतलेल्या सरकारला जागे करण्यासाठी व व्यापारी वर्गाला योग्य न्याय मिळावा, याकरिता शहरातील सर्व व्यापारी विविध ठिकाणी आज दुपारी घंटानाद आंदोलनाला सुरुवात झाली आहे.
उद्यापासून पुणे शहरातील सर्व दुकाने ७ वाजेपर्यंत उघडी ठेवण्यात येतील. यावेळी आम्हाला अटक करून आमच्यावर कारवाई झाली. तरी आम्ही त्यास सामोरे जाण्यास तयार असल्याची भूमिका शहरातील व्यापाऱ्यांनी घेतली आहे.
रविवारी व्यापारी महासंघाने पत्रकार परिषद घेतली होती. त्यानंतर सरकारला निर्णयासाठी दोन दिवसांची मुदत देण्यात आली होती. नाहीतर बुधवारपासून दुकाने ७ पर्यंत उघडी ठेवणार असा इशाराही देण्यात आला होता. अजूनही सरकारने व्यापाऱ्यांच्या मागणीची दाखल घेतली नसल्याने हे आंदोलन करण्यात आले आहे.
दुसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेत ५ एप्रिल, २०२१ पासून राज्य सरकारने पुणे शहरात जीवनावश्यक वस्तूंखेरीज बाजारपेठेतील इतर सर्व व्यवसायांवर वेळेची बंधने आणली. मात्र आता चार महिने उलटून गेले तरीही यामध्ये अपेक्षेप्रमाणे शिथिलता आलेली नाही़. एकीकडे बाजारपेठा सोडून सर्व गोष्टी चालू आहेत, राजकीय सभा समारंभ, आमदारांच्या मुलांचे शाही विवाह होतात. परंतु, दुसरीकडे व्यापारी वर्गालाच लॉकडाऊनचे नियम लादले जात आहेत. यामुळे व्यापारी वर्गात मोठा असंतोष असून राज्याचे उपमुख्यमंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी, वेळेत वाढ करण्याबाबत पंधरा दिवसांपूर्वी व्यापाऱ्यांना दिलेले आश्वासन पाळावे अशी मागणी व्यापारी महासंघाचे अध्यक्ष फत्तेचंद रांका यांनी केली होती.