बेलवाडी परिसरात ‘लाळखुरकत’ने जनावरे दगावली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2021 04:12 AM2021-09-22T04:12:12+5:302021-09-22T04:12:12+5:30
शेतकºयांमध्ये काळजीचे वातावरण लासुर्णे : बेलवाडी, जंक्शन व आनंदनगर परिसरात अशी जनावरे दगावल्याने शेतकऱ्यांमध्ये काळजीचे वातावरण आहे. इंदापूर तालुक्यात ...
शेतकºयांमध्ये काळजीचे वातावरण
लासुर्णे : बेलवाडी, जंक्शन व आनंदनगर परिसरात अशी जनावरे दगावल्याने शेतकऱ्यांमध्ये काळजीचे वातावरण आहे. इंदापूर तालुक्यात लाळ खुरकात रोगाने थैमान घातल्याचे चित्र आहे. या भागातीलही शेतकऱ्यांची अनेक जनावरे लाळ खुरखत रोगाने दगवली आहेत. यामध्ये शेळ्या आणि दुभत्या गायींचा समावेश आहे. दुसरीकडे प्रशासनाने केंद्राकडूनच लसीकरण लांबल्याचे सांगितल्याने शेतकरी हतबल झाला आहे.
कुटुंबाच्या चरितार्थाचे साधन असणारी जनावरेच दगावल्याने आता शेतकऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे. पशुसंवर्धन विभागाने लाळखुरकात रोगाने दगावलेल्या जनावरांची नुकसान भरपाई मिळण्याची मागणी होत आहे. तालुक्यात पशुपालन हा शेतीला जोडधंदा म्हणून व्यवसाय केला जातो. परंतु या रोगाने थैमान घातल्याने या भागातील पशुपालन व्यवसाय कोलमडणार आहे. पशुसंवर्धन विभागाने यावर तालुक्यात सर्व्हे करावा, ज्या शेतकऱ्यांची जनावरे दगावली आहेत. त्या सर्व शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळण्याची मागणी पशुपालकांमधून होत आहे.
नुकताच लसीकरण कार्यक्रम पशुसंवर्धन विभाग जिल्हा परिषद पुणे व पंचायत समिती इंदापूर यांच्या संयुक्त विद्यमाने संपूर्ण तालुक्यात राबविला गेला. तालुक्यात एकूण मोठी जनावरे १ लाख ७० हजार ४६५ एवढी असून सदर जनावरांसाठी एकूण १ लाख ५८ हजार लाळखुरकत लस मात्रा इंदापूर तालुक्यासाठी प्राप्त झाली आहे. लस तालुक्यांमधील संपूर्ण मोठ्या जनावरांना टोचली जाणार आहे. लाळखुरकूत लसीकरण दुसरी फेरी २१ दिवसांमध्ये तालुक्यात पूर्ण करण्यात येणार आहे. परंतु या दगावलेल्या जनावरांचे काय, असा सवाल शेतकऱ्यांमधून विचारला जात आहे.
——————————————————
...लाळ खुरकत लस कार्यक्रम हा केंद्राचा विषय
यावर जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. शिवाजी विधाटे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले की, लाळखुरकत लस कार्यक्रम हा केंद्राचा विषय आहे. मार्च-एप्रिलमध्ये लस यायला पाहिजे होती. ती उशिरा आली. परंतु जर जनावर खात नसेल तर शेतकऱ्यांनी दिवसातून चार वेळा तरी जंतुनाशक पावडरने जनावरांचे तोंड व पाय धुवावेत. चारा न देता ‘लिक्विड’ स्वरुपात खाद्य द्यावे. ज्या शेतकऱ्यांची जनावरे दगावली आहेत,त्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळते. परंतु सध्या निधीची कमतरता असल्याने वाढीव निधीची मागणी केली जाणार असल्याचे डॉ. विधाटे यांनी सांगितले.
—————————————————