हर घर गोठा योजनेच्या पैशाच्या प्रतीक्षेत लाभार्थी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2021 04:11 AM2021-07-28T04:11:31+5:302021-07-28T04:11:31+5:30
केडगाव : रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून ‘हरघर गोठा, घरघर गोठा’ या योजने अंतर्गत गोठे बांधले. मात्र, लाभार्थ्यांना अद्यापही याचे ...
केडगाव :
रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून ‘हरघर गोठा, घरघर गोठा’ या योजने अंतर्गत गोठे बांधले. मात्र, लाभार्थ्यांना अद्यापही याचे पैसे मिळाले नसल्याने ते कधी मिळणार असा सवाल उपस्थित केला आहे.
अनेक दिव्य अडचणींचा सामना करत लाभार्थ्यांनी शासनाने घालून दिलेल्या नियमानुसार गोठा तसेच कुक्कुटपालन शेड आदी बनवले आहेत. वर्षभराचा कालावधी लोटूनही या लाभार्थ्यांना कुठल्याही प्रकारचे अनुदान मिळत नसल्यामुळे अनेक अर्जदारांनी कारभाराबाबत नाराजी व्यक्त केली आहे.
कोरोना संसर्ग आणि लॉकडाऊनमध्ये रोजगार निर्मिती व्हावी यासाठी गायी, म्हशी, शेळ्या, मेंढ्या आणि कोंबडी पालन करणाऱ्या शेतकऱ्यांना रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून मागेल त्याला गोठा तयार करण्यासाठी शंभर टक्के अनुदान देण्यात येत होते. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून 'हरघर गोठे, घरघर गोठे' या योजनेची आधीच घोषणा केली आहे़ राज्यात केंद्र पुरस्कृत महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना आणि राज्य पुरस्कृत महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजना एकत्रितपणे राबविण्यात येत आहे. गायी आणि म्हशींसाठी गोठ्याचे शेड बांधण्यासाठी राज्य पुरस्कृत रोजगार हमी योजनेतून प्रत्येकी ३५ हजार रुपयांचे अनुदान व केंद्र पुरस्कृत रोजगार हमी योजनेतून गोठ्यांचे सिमेंट काँक्रीटचे पक्के तळ, गव्हाण आणि मूत्रसंचय टाकी यासाठी ३५ हजार रुपयांचे वेगळे अनुदान मिळणार आहे. या योजनेत जिल्हा परिषदेने दोन प्रकार केले आहेत. योजनेंतर्गत गोठ्यासाठी अनुदान घेण्यासाठी वुक्षारोपन करणे अनिवार्य आहे. यासाठी एक गोठा पन्नास झाडे असे सूत्र अवलंबले जात आहे. तेही अनेक लाभार्थ्यांनी पूर्ण केले आहे.
माणगावचे सामाजिक कार्यकर्ते रामदास दोरगे म्हणाले, गावातील बाळू चव्हाण व आशा रामदास दोरगे यांनी सर्व प्रक्रिया पूर्ण करून देखील त्यांना अद्याप निम्मे पैसे आले आहेत. शासनाने लवकरात लवकर उर्वरित रक्कम जमा करावी.
कोट
अनेक लाभार्थ्यांना पहिला हप्ता देण्यात आले असून उर्वरित हप्तेही लवकरच दिले जातील.
-अजिंक्य येळे, गटविकास अधिकारी.