लाखापर्यंतच्या खातेदारांना मिळणार पैसे, खातेदार-ठेवीदारांकडून अर्ज मागविणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2018 01:25 AM2018-03-15T01:25:53+5:302018-03-15T01:25:53+5:30
विमा महामंडळाकडे (डीआयसीजीसी) बँकेच्या प्रस्तावास मान्यता दिल्याने लोकसेवा बँकेच्या एक लाख रुपयांपर्यंत रक्कम असणाऱ्या खातेदारांना संपूर्ण रक्कम मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
पुणे : विमा महामंडळाकडे (डीआयसीजीसी) बँकेच्या प्रस्तावास मान्यता दिल्याने लोकसेवा बँकेच्या एक लाख रुपयांपर्यंत रक्कम असणाऱ्या खातेदारांना संपूर्ण रक्कम मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या निर्णयामुळे बँकेच्या ९ हजार २८१ खातेदारांना फायदा होणार आहे. शुक्रवारपासून (दि. १६) बँकेच्या खातेदारांकडून विहित नमुन्यातील अर्ज भरून त्यांना खात्यातील रकमेचा धनादेश देण्यात येणार आहे.
आर्थिक अनियमिततेमुळे लोकसेवा सहकारी बँकेवर रिझर्व्ह बँक आॅफ इंडियाने (आरबीआय) आर्थिक निर्बंध घातले आहेत. त्यामुळे खातेदार-ठेवीदारांचे पैसे खात्यात अडकले आहेत. लोकसेवा बँकेचे अवसायक तथा जिल्हा उपनिबंधक बी. टी. लावंड यांनी विमा महामंडळाकडे एक लाख रुपयांच्या आतील ठेवीदारांचे पैसे देण्यासाठी परवानगी मागितली होती. विशेष म्हणजे, बँकेच्या निधीतूनच हे पैसे देण्याची बँकेची तयारी आहे.
विमा महामंडळाला प्रस्ताव आणि स्मरणपत्रे पाठवूनही त्यावर गेल्या दोन महिन्यांपासून काहीच कार्यवाही होत नव्हती. अखेरीस सहकार विभागाच्या मान्यतेचे पत्र आणि इतर अटी व शर्तींसह विमा महामंडळाने लोकसेवा बँकेच्या अवसायकांना एक लाख रुपयांपर्यंत ठेवी असलेल्या खातेदारांना पैसे देण्याची परवानगी दिली आहे. लोकसेवा बँकेला १८० कोटी रुपयांच्या ठेवी द्यायच्या आहेत. त्यात ८३ पतसंस्थांच्या १२२ कोटी रुपयांचा समावेश आहे. तर, दीड हजार ठेवीदारांचे ४२ कोटी रुपये देणे आहे. तर, एक लाखावरील ठेवी असणारे १ हजार १७७ खातेदार आहेत. त्यांचे १६३ कोटी ५७ लाख रुपयांच्या ठेवी देणे आहेत.
>खातेदारांना आवश्यक कागदपत्रे
एक लाख रुपयांपर्यंत ठेवी असणाºया खातेदारांकडून विहित नमुन्यातील अर्ज भरून घेण्यात येणार आहे. त्यासोबत आधार कार्ड, पॅन कार्ड आणि एक छायाचित्र आवश्यक आहे. जॉइंट खाते असल्यास दोघा खातेदारांचा फोटो गरजेचा आहे. ही कागदपत्रे नसल्यास वाहनपरवाना अथवा शिधापत्रिका पुरावा म्हणून ग्राह्य धरण्यात येईल. अर्ज भरल्यानंतर खातेदारांना एक तारीख दिली जाईल. त्या दिवशी त्यांना रकमेचा धनादेश दिला जाईल.
>बँकेचे एक लाख रुपयापर्यंत रक्कम असलेले ९ हजार २८१ खातेदार आहेत. त्यांना १७ कोटी ९८ लाख रुपयांची देणी द्यायची आहेत. बँकेकडे सप्टेंबर २०१७ अखेरीस १२८ कोटी रुपयांची रोखता (लिक्विडीटी) होती. जानेवारी महिन्यापर्यंत चार कोटी रुपयांची वसुली झाली आहे, तर ठेवींवर एक कोटी रुपयांचे व्याज मिळाले आहे. त्यामुळे बँकेची रोखता वाढली आहे.