सावित्रीबाई फुले विद्यापीठात सुरू होणाऱ्या ऑक्सिपार्क योजनेत पुणेकरांसाठी विविध सुविधांचा लाभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2021 12:10 PM2021-03-20T12:10:18+5:302021-03-20T12:11:15+5:30
पुणेकरांसोबत ऋणानुबंध निर्माण करण्याच्या उद्देशाने सुरू होणार ऑक्सिपार्क
पुणे: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ येथे सुरू होणाऱ्या ऑक्सिपार्क योजनेत क्रीडांगण, ग्रंथालय, वैद्यकीय सेवा या सुविधांबरोबरच सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचा आस्वाद पुणेकरांना घेता येणार आहे.
विद्यापीठाच्या ४०० एकरच्या निसर्गरम्य परिसरात असंख्य पुणेकर जॉगिंगला येतात. त्यामुळे त्यांच्यासोबत ऋणानुबंध निर्माण करण्याच्या उद्देशाने ऑक्सिपार्क योजना सुरू करण्यात येणार आहे. येथे फिरायला, जॉगिंगला अथवा व्यायाम करण्यासाठी येणाऱ्या लोकांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. त्या पार्श्वभूमीवर हि योजना राबवण्यात आली आहे. विद्यापीठाच्या व्यवस्थेने योजनेसाठी सशुल्क आकारले असून आपले उत्पन्न वाढवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. पुणेकरांनीही या योजनेचे भरभरून कौतुक केले आहे. त्यांचा योजनेला सकारात्मक प्रतिसाद आहे.
विद्यापीठात मोठया प्रमाणात वृक्ष आहेत. सर्वत्र हिरवाई पसरली आहे. दररोज सकाळी नागरिक जॉगिंगला येतच असतात. पण सुट्टीच्या दिवशीची संख्या ही लक्षणीय असते. विद्यापीठाशी पुणेकरांचे एक वेगळेच नाते तयार झाले आहे. त्यामुळेच नागरिक योजनेत सहभागी होण्यास तयार झाले आहेत. योजनेत शुल्क भरण्यासाठी पर्याय उपलब्ध करून दिले जाणार आहेत. योजनेअंतर्गत नागरिकांनी नोंदणी करण्याबरोबरच, विद्यापीठातील सोयीसुविधांचा लाभ घेता येणार आहे. योजनेच्या माध्यमातून पुणेकरांचा विद्यापीठाच्या प्रशासनाशी संबंध वाढणार आहे. त्यामुळे विद्यापीठाचे ब्रँडिंग होण्यासही मदत होणार असल्याचे प्रशासन अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.
ऑक्सिपार्क योजनेच्या माध्यमातून पुणेकरांशी चर्चा करून त्यांची मते जाणून घेता येईल. त्यामुळे या योजनेचा नागरिक आणि विद्यापीठ दोघांनाही फायदा होणार आहे. योजनेत सहभागी नसलेल्या नागरिकांनाही फिरायला येता येणार आहे. विद्यापीठ सर्वांसाठी खुले आहे. सावित्रीबाई फुले विद्यापीठाचे कुलगुरू डॉ नितीन करमळकर यांनी सांगितले आहे.