अन्नसुरक्षा योजनेतील २६ लाख ९० हजार लाभार्थ्यांना लाभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2021 04:09 AM2021-04-16T04:09:26+5:302021-04-16T04:09:26+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : राज्यातील कोरोनाची साखळी तोडण्यासाठी राज्य शासनाने एप्रिलअखेरपर्यंत कडक लाॅकडाऊन जाहीर केले आहे. या निर्णयाच्या ...

Benefits to 26 lakh 90 thousand beneficiaries of food security scheme | अन्नसुरक्षा योजनेतील २६ लाख ९० हजार लाभार्थ्यांना लाभ

अन्नसुरक्षा योजनेतील २६ लाख ९० हजार लाभार्थ्यांना लाभ

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : राज्यातील कोरोनाची साखळी तोडण्यासाठी राज्य शासनाने एप्रिलअखेरपर्यंत कडक लाॅकडाऊन जाहीर केले आहे. या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर गरीब व सर्वसामान्य नागरिकांची उपासमार होऊ नये म्हणून, राज्य शासनाने मोफत धान्य वाटप करण्याचा निर्णय घेतला आहे. याच पुणे जिल्ह्यात ग्रामीण भागातील सुमारे २६ लाख ९० हजार लाभार्थ्यांना लाभ मिळणार आहे. परंतु अद्याप याबाबतचा स्पष्ट अध्यादेश आला नसल्याचे जिल्हा पुरवठा अधिकारी भानुदास गायकवाड यांनी सांगितले.

केंद्र सरकारने मागील लॉकडाऊनच्या कालावधीत केशरी शिधापत्रिकाधारकांना आठ रुपये प्रतिकिलो दराने गहू आणि १२ रुपये दराने तांदूळ उपलब्ध करून दिला होता. ही योजना मागील नोव्हेंबरपर्यंत होती. सध्याच्या कोरोना कालावधीत केशरी शिधापत्रिकाधारकांना धान्याची गरज आहे. अन्नसुरक्षा योजनेतील शिधापत्रिकाधारकांना सध्या प्रत्येकी दोन रुपये दराने तीन किलो गहू आणि तीन रुपये दराने दोन किलो तांदूळ उपलब्ध करून दिला जातो. या योजनेतील जिल्ह्यातील एकूण शिधापत्रिकाधारकांची संख्या सुमारे २ लाख ६९ हजार असून, लाभार्थ्यांची संख्या २६ लाख ९० हजार एवढी आहे.

अन्नसुरक्षा योजनेतील शिधापत्रिकाधारकांना सध्या अत्यल्प दराने गहू-तांदूळ मिळतच आहे. त्यांना मोफत धान्य देण्याचा निर्णय घेतला, ही चांगली बाब आहे. परंतु केशरी शिधापत्रिकाधारकांनाही कमी दरात धान्य उपलब्ध करून देणे गरजेचे आहे, असे मत रेशन दुकानदार संघटनेचे शहराध्यक्ष गणेश डांगी यांनी व्यक्त केले.

-----

चढ्या दराने विक्री केल्यास कारवाई

जिल्ह्यात जीवनावश्यक वस्तूंची आणि औषधांची कोणतीही टंचाई नाही. किराणा दुकांनामधून वस्तूंचा पुरवठा सुरळीत व्हावा याकरिता शासन यंत्रणा खबरदारी घेत आहे. मात्र, सध्या लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर काळाबाजार व अतिरिक्त भाववाढीच्या अनेक ठिकाणांहून तक्रारी प्राप्त होत आहेत. जीवनावश्यक वस्तूंची साठेबाजी किंवा चढ्या दराने विक्री केल्यास सात वर्षांपर्यंत कैद होऊ शकते. याबाबत पुरवठा विभाग, वैधमापनशास्त्र विभाग व पोलीस यांना संयुक्त कारवाई करण्याचे आदेश देण्यात आल्याची माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी भानुदास गायकवाड यांनी दिली.

-------

जिल्ह्यात ग्रामीण भागातील एवढ्या लाभार्थ्यांना मिळणार लाभ

आंबेगाव- 210089

बारामती - 369019

भोर - 130547

दौंड- 249386

हवेली - 85270

इंदापूर- 305976

जुन्नर- 297820

खेड - 306907

मावळ- 190062

मुळशी - 87474

पुरंदर- 172147

शिरूर- 248947

वेल्हा - 36706

Web Title: Benefits to 26 lakh 90 thousand beneficiaries of food security scheme

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.