खेळाडू, कलाकारांना मुक्त शिक्षणाचा फायदा :विनोद तावडे
By ऑनलाइन लोकमत | Published: January 10, 2019 05:24 PM2019-01-10T17:24:38+5:302019-01-10T17:26:19+5:30
राज्य शासनाकडून सुरू करण्यात आलेल्या मुक्त शिक्षण विद्यालय मंडळामुळे खेळाडू, कलाकरांना दिवसातून ८ ते १० तास सराव करता येईल.
पुणे : राज्य शासनाकडून सुरू करण्यात आलेल्या मुक्त शिक्षण विद्यालय मंडळामुळे खेळाडू, कलाकरांना दिवसातून ८ ते १० तास सराव करता येईल. त्यांना या मंडळाचा चांगला फायदा होऊ शकेल असा आशावाद शिक्षणमंत्रीविनोद तावडे यांनी गुरूवारी व्यक्त केला.
महाराष्ट्र विद्यालय मंडळाच्या इयत्ता ५ वी व इयत्ता ८ वीच्या ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेचा शुभारंभ मुक्त विद्यालयात प्रवेश घेऊ इच्छिणाºया विद्यार्थीनी स्वराली जोगळेकर, पाखी जैन व विनोद तावडे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी शिक्षण विभागाच्या सचिव वंदना कृष्णा, शिक्षण आयुक्त विशाल सोळंखी, राज्य मंडळाच्या अध्यक्ष शंकुतला काळे उपस्थित होते.
विनोद तावडे म्हणाले, मुक्त शिक्षण मंडळाचे प्रमाणपत्र हे इतर मंडळांच्या समकक्ष असणार आहे. मुक्त शिक्षण मंडळासाठी अभ्यासक्रम तयार करण्याचे आव्हानात्मक काम पार पाडले आहे. विद्यार्थ्यांनी कला, वाणिज्य व विज्ञान शाखेत ठरवून दिलेलेच विषय शिकले पाहिजेत असे नाही. विज्ञानाचा विद्यार्थ्याला भाषा, संगीतही शिकता आले पाहिजे. विद्यार्थ्यांना ज्या साचेबध्द शिक्षणात अडकवले आहे, त्यातून बाहेर काढण्याचा प्रयत्न शासनाकडून केला जात आहे.
आपला अभ्यासक्रम औद्योगिक क्रांती नंतरच्या काळावरच अडकून पडला आहे, त्यामध्ये बदल करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. विद्यार्थ्यांना घोकंमपटटीपासून दूर करण्यासाठी प्रश्नपत्रिकांच्या स्वरूपामध्ये बदल करून कृतिपत्रिका आणण्यात आल्या असे तावडे यांनी सांगितले.यावेळी मुक्त शिक्षण मंडळाच्या पुस्तिकांचे प्रकाशन करण्यात आले. शंकुतला काळे यांनी प्रास्ताविक केले तर अशोक भोसले यांनी आभार मानले.
मुक्त शिक्षण मंडळामध्ये सुधारणेला वाव
मुक्त शिक्षण मंडळाबाबत अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. मात्र मुक्त शिक्षण विद्यालय मंडळाची आता सुरूवात झालेली आहे. यामध्ये सुधारणा, बदल करण्याबाबत पालक, शिक्षक, स्वयंसेवी संस्था यांनी सुचना कराव्यात. मुक्त विद्यालय मंडळाकडून या सुचनांचे स्वागत केले जाईल असे विनोद तावडे यांनी स्पष्ट केले.