बंगाली चित्रपट पुण्यात
By Admin | Published: December 23, 2016 01:01 AM2016-12-23T01:01:49+5:302016-12-23T01:01:49+5:30
भारतीय चित्रपटसृष्टीमध्ये प्रादेशिक चित्रपटांच्या दर्जेदार मांडणी आणि प्रभावी सादरीकरणाने ज्येष्ठ दिग्दर्शक ऋत्विक घटक
पुणे : भारतीय चित्रपटसृष्टीमध्ये प्रादेशिक चित्रपटांच्या दर्जेदार मांडणी आणि प्रभावी सादरीकरणाने ज्येष्ठ दिग्दर्शक ऋत्विक घटक यांनी स्वत:चे वेगळे स्थान निर्माण केले. चित्रपटक्षेत्रात उल्लेखनीय योगदान दिलेले त्यांचे तीन अपूर्ण आणि अद्याप प्रदर्शित न झालेले चित्रपट राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाला (एनएफएआय) मिळाले आहेत.
देश-विदेशातील विविध छोटी संग्रहालये, अभ्यासक, चित्रपटप्रेमी मंडळी यांच्याकडे असलेले दुर्मिळ चित्रपट मिळवून ते जतन करण्याची मोहीम एनएफआयआयने हाती
घेतली आहे.
ऋत्विक घटक यांची मुले संहिता घटक आणि रितबन घटक यांच्या ‘ऋत्विक घटक मेमोरियल ट्रस्ट्र’ने घटक यांच्या अपूर्ण आणि अप्रदर्शित चित्रपटांची माहिती राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाला दिली होती. त्यानुसार एनएफएआयने पश्चिम बंगाल राज्य सरकारकडे या संदर्भात पत्रव्यवहार केला.
तीन महिन्यांपासून हे चित्रपट मिळण्यासाठी प्रयत्न सुरू होते. सरकारने त्याला मान्यता दिली असून, ऋत्विक घटक यांचे ‘काटो अजनारे’ (१९५९), बंगार बंगा दर्शन (१९६४) आणि रांगेर गुलाम (१९६८) हे अपूर्ण चित्रपट एनएफएआयला जतन व संवर्धनासाठी मिळाले असल्याची माहिती राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाचे संचालक प्रकाश मगदूम यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत दिली.
या चित्रपटांचे डिजिटायझेशन करण्यात येणार आहे. या चित्रपटांची पाहणी आणि तपासणीसाठी एनएफएआयचे तज्ज्ञ नुकतेच कोलकाता येथे गेले होते. त्यांनी या चित्रपटांची पाहणी केल्यानंतर हे चित्रपट प्रेक्षकांसाठी प्रदर्शित करण्याच्या स्थितीत असल्याचे
लक्षात आले.
(प्रतिनिधी)